Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मागच्या वर्षीपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन! आत्तापर्यंत किती झाले उस गाळप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 12:51 IST

सध्या राज्यातील उसाचा गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे.

पुणे : सध्या राज्याचा उसाचा गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. तर काही साखर कारखान्यांकडे उसाची उपलब्धता असल्याने गाळप सुरूच आहे. हंगाम येणाऱ्या १५ दिवसात संपेल अशी शक्यता आहे. तर साखर आयुक्तांच्या अहवालानुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन वाढल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, पावसाच्या कमतरतेमुळे यंदा गाळप हंगाम लवकरच संपेल अशी शक्यता होती पण नोव्हेंबरच्या अखेर अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपले. या पावसाचा फायदा उसाला झाला आणि परिणामी उत्पादन वाढले म्हणून हंगाम लांबला असल्याचे चित्र आहे. 

उसाचे उत्पादन वाढलेयंदा उसाचे गाळप कमी होऊन साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असताना सध्याच्या अहवालानुसार साखरेचे उत्पादन वाढल्याचे दिसत आहे. २७ मार्च अखेरच्या उस गाळप हंगामाच्या अहवालानुसार राज्यात आत्तापर्यंत १ हजार ५९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर मागच्या वर्षीच्या गाळप हंगामात याच वेळेस १ हजार ४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा केंद्र सरकारने इथेनॉलच्या निर्मितीवर बंधने घातल्यामुळे साखरेचे उत्पादन वाढले आहे.

किती कारखान्यांचे गाळप बंदराज्यातील कमी पाण्याच्या भागातील अनेक साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. सध्या राज्यातील १२० साखर कारखान्यांनी गाळप थांबवले असून ८७ साखर कारखाने अद्याप सुरू आहेत. कोल्हापूर विभागातील ४० पैकी २०, पुणे विभागातील ३१ पैकी १६, सोलापूर विभागातील ५० पैकी ३८, अहिल्यानगर विभागातील २७ पैकी १३ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे.

किती दिवस चालणार कारखाने?सध्या बहुतांश साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे तर ज्या भागात पाण्याची आणि उसाची उपलब्धता आहे अशा भागांतील कारखाने सुरू आहेत. हेही साखर कारखाने येणाऱ्या १५ दिवसांत आपले गाळप थांबवतील अशी शक्यता आहे. तर कारखान्यांनी ज्या सभासदांचे उस राहिले आहेत अशा शेतकऱ्यांना मालकतोड करून उस कारखान्यांपर्यंत पोहोच करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊससाखर कारखाने