Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agro Advisory : उन्हाळी तीळ, हळद आणि इतर पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 20:17 IST

Agro Advisory : मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. उन्हाळी तीळ (unhali til), हळद (halad) आणि इतर पिकांसाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारशी दिल्या आहेत. त्या वाचा सविस्तर

Agro Advisory :  मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. उन्हाळी तीळ (unhali til), हळद (halad) आणि इतर पिकांसाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारशी दिल्या आहेत. त्या वाचा सविस्तर 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात २४ व २५ फेब्रुवारी रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर २३, २४ व २५ फेब्रुवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहील.

२३ फेब्रुवारी रोजी धाराशिव व लातूर जिल्ह्यात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात येत्या ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

 हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात २४ व २५ फेब्रुवारी रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर २३, २४ व २५ फेब्रुवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहील.

२३ फेब्रुवारी रोजी धाराशिव व लातूर जिल्ह्यात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात येत्या ४ ते ५ दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिन २७ फेब्रुवारीपर्यंत पाऊस सरासरीएवढा ते सरासीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक २८ फेब्रुवारी ते ०६ मार्चदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस : ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद : हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.  काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी व काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा.

करडई : करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. 

उन्हाळी तीळ : वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी व भारी जमिनीत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

तापमानात होत असलेल्या वाढीमुळे संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यामध्ये चिलेटेड झिंक ५ ग्रॅम + चिलेटेड आयर्न ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.  

चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड २० टक्के एसपी २ ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल १०.२६ ओडी १२ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

रेशीम उद्योजकांच्या रेशीम अळ्या कोष न करणे किंवा पोचट कोष होणे हा प्रश्न आहे. बहुतांशी शेतकरी कापूस, ऊस, सोयाबीन व भाजीपाला आदी पिकांकडून तुती लागवडीकडे वळलेले आहेत. 

पुर्वी शेतातील जमिनीत पीक संरक्षण करण्यासाठी वापरात आलेले किटकनाशक उदा. कोराझीन किंवा बुरशीनाशक, तणनाशक उदा. ग्लायफोसेट आदी चे प्रमाण किंवा शिल्लक राहीलेला अंश जमिनीत राहिलेला असतो. नंतर तेथे तुती लागवड केली जाते आणि तुतीला आलेली पाने रेशीम किटकास खाद्य म्हणून दिल्यावर  किटक मरताना दिसतात किंवा अळ्या कोष करत नाहीत, पोचट कोष होतात. त्यावर उपाय म्हणजे २० टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टर किंवा ५ टन गांडूळ खत समान दोन हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिन्यात जमिनीत द्यावे व नंतर हलके पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

* कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा.

* उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयुक्त, खनिजमिश्रण आणि मिठयुक्त खाद्य द्यावे.

* पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे. जनावरांचा घरी खुराक तयार करतांना सरकी/खापरी पेंड दूध वाढत म्हणून ३३ टक्के पेक्षा जास्त वापरली तर जास्त खर्च होतो आणि रक्तातील अमोनियाचे प्रमाण वाढून दूधातील जनावरे महिनोंमहिने उलटतात, म्हणून दुग्ध व्यवसायात ही काळजी घ्यावी.

(सौजन्‍य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनकृषी विज्ञान केंद्रशेतकरीशेतीपीक