विविध कारणास्तव कृषी विभागाने एप्रिल महिन्यातच ८ कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे, तर १० विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली असून, सुधारणा न झाल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील विविध कृषी केंद्रांच्या तपासणीत अनियमितता, तसेच नियमांचे उल्लंघन आढळले होते. ज्यामुळे सदरील परवाना धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत काही परवाने तात्पुरत्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत, तर काही परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
या गावातील विक्रेत्यांचे परवाने झाले निलंबित
कृषी विभागाने केलेल्या कारवाईत परवाना निलंबित झालेल्या विक्रेत्यांमध्ये साखरे आणि धरणगाव, चिनावल व रावेर, आसोदा (जळगाव), रिंगणगाव (एरंडोल), जळगाव, जळांद्री, वाकडी (जामनेर), नागलवाडी, चोपडा, बहादरपूर, मुंदाणे, ढोली, बोळे, भिलाली (पारोळा) येथील विक्रेत्यांचा समावेश आहे.
मान्सूनपूर्व तपासणी मोहीम
राज्य शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने मार्च महिन्यापासून कृषी केंद्रांची तपासणी सुरू झाली आहे. या तपासणीत अनियमिततेसह अन्य बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्याने नोटीस बजावून या विक्रेत्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. त्यानुसार अंतिम सुनावणीत ८ कृषी परवाने निलंबित केले आहेत.
तालुकानिहाय कारवाई
धरणगाव : ०२जळगाव : ०३रावेर : ०२एरंडोल : ०१ जामनेर : ०५ पारोळा : ०५ चोपडा : ०५
जिल्ह्यात सर्वत्र कृषी केंद्रांची कसून तपासणी सुरू आहे. अनियमिता आढळल्यास तातडीने कारवाई केली जात आहे. - विकास बोरसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव.