Join us

Agricultural Pump : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा; किती शेतकरी लाभार्थी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:08 IST

Agricultural Pump : बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा केला जात आहे. त्याची अमंलबजावणी सुरू झाली असून किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार ते वाचा सविस्तर

यवतमाळ : बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना (Agricultural Pump) मोफत वीजपुरवठा केला जात आहे. पुढील पाच वर्षांपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना शून्य वीजबिल (Zero Electricity Bill) पाठविले जाणार आहे.

त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. या योजनेतून पहिल्या सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९१ कोटी रुपयांची वीजबिल माफी देण्यात आली आहे. कृषिपंपातील चालू वीजबिलाची थकबाकी पुढील पाच वर्षे सरकार भरणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात एक लाख ३० हजार १७५ कृषिपंपधारक आहेत. या कृषिपंपधारकांना दर तीन महिन्याला ८५ कोटी रुपयांचे वीजबिल दिले जाते. चालू वीजबिलाचे चुकारे सरकार जमा करणार आहे. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्यांचे १९१ कोटी रुपयांचे वीजबिल सरकारने माफ केले आहे.

यामुळे शेतकऱ्यांवर येणारा कृषिपंपाचा थकीत वीजबिलांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे थकीत वीजबिलामुळे कापली जाणारी शेतकऱ्यांची वीज आणि डीपी दुरुस्तीचा प्रश्न निकाली निघणार आहे.

२२००  कोटी रुपयांची जुनी थकबाकी कायम

नियमित वीज बिलाला राज्य शासनाने बिलमाफी दिली आहे. याचवेळी जुने थकीत वीज बिल या संदर्भात कुठल्याही सूचना निघालेल्या नाहीत.

सव्वा लाख शेतकऱ्यांची चिंता मिटली

दर तीन महिन्याला कृषिपंपाचे वीजबिल दिले जाते. याकरिता वीज वितरण कंपनीकडून वसुली मोहीम राबविली जाते. हिवाळा आणि उन्हाळा या हंगामात डीपीवर काही बिघाड झाला अथवा तार जळाली तर चालू थकीत बिल प्रथम भरायला लावले जात होते. शेतकऱ्यांचे बिल सरकार भरत असल्याने सव्वा लाख शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

२०२९ पर्यंत आर्थिक भार सरकार वाहणार * एप्रिल, मे आणि जून त्याचप्रमाणे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे १९१ कोटींचे बिल सरकारने भरले आहे. याच पद्धतीने २०२९ पर्यंत सरकार दर तीन महिन्यांचे आलेले बिल भरणार आहे.

* यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करताना कुठलीही अडचण येणार नाही. शेतकऱ्यांना सिंचनाच्या माध्यमातून समृद्धी साधण्यास हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

* सिंचन करताना वीज दुरुस्तीअभावी ओलिताच्या अडचणी थांबणार आहे.

* सव्वा लाख कृषिपंपांना दिलासा

बळीराजा मोफत वीजबिल योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना शून्य वीजबिल राहणार आहे. सहा महिन्यांचे १९१ कोटींचे बिल सरकारने माफ केले आहे. - प्रवीण दरोली, अधीक्षक, वीज वितरण कंपनी, यवतमाळ

हे ही वाचा सविस्तर :  Maharashtra Weather Update : कमाल तापामानात होतेय वाढ; कसे असेल आजचे हवामान IMD चा रिपोर्ट वाचा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीवीजशेतीसरकारी योजनाकृषी योजना