Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकांचा संप मागे; कोणकोणत्या मागण्या झाल्या मान्य? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:31 IST

राज्यातील कृषी सहायकांचे गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेले असहकार आंदोलन अखेर प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर स्थगित करण्यात आले आहे.

पुणे : राज्यातील कृषी सहायकांचे गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेले असहकार आंदोलन अखेर प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर स्थगित करण्यात आले आहे.

कृषी सहायकांना आता यापुढे सहायक कृषी अधिकारी, तर कृषी पर्यवेक्षकांना उप कृषी अधिकारी, असा पदनामात बदल करण्याचा निर्णय थेट राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

तसेच, कृषी निविष्ठांच्या वितरणात सुधारणा, आकृतीबंधात पदांची संख्या वाढविण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे यांनी सांगितले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याला आता वेग येणार आहे.

समान काम समान वेतन या धोरणानुसार कृषी सेवकांना कृषी सहाय्यक म्हणून नियमित करावे, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील कृषी सहायकांनी ५ ते १५ मे असहकार आंदोलन पुकारले होते.

मागण्या मान्य न झाल्याने १५ मेपासून पूर्ण काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. परिणामी कृषी विभागाचे ग्रामस्तरावरील काम ठप्प झाले होते.

दरम्यान, पदनाम बदलाची मागणी मान्य केल्यास भविष्यात वेतनश्रेणी वाढवून मागण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही, असा शेरा सामान्य प्रशासन व वित्त विभागाने दिला होता.

कृषी विभागाने कृषी सहायकांची ही मागणी मान्य करण्यापूर्वी वेतनश्रेणीत वाढ करणार नाही, असे संघटनेकडून लेखी हमीपत्र घ्यावे, अशा सूचना कक्ष अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्तांना दिल्या होत्या. त्यामुळे कृषी सहायकांचे पदनाम बदलण्यात येणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती.

राज्य सरकारशी झालेल्या चर्चेनंतर पदनाम बदलाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती रिंढे यांनी या वेळी दिली.

पदनाम बदलाच्या मागणीसह कृषी सहायकांना आता लॅपटॉप देण्याचे, खते आणि औषधांच्या वितरण प्रणालीत सुधारणा, तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधातही पदांची संख्या वाढवून देण्याचेही सरकारने आश्वासन दिले आहे. - विलास रिंढे, अध्यक्ष, कृषी सहायक संघटना

अधिक वाचा: खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय

टॅग्स :शेतीशेतकरीखरीपराज्य सरकारसरकारमाणिकराव कोकाटेमंत्रीपुणेखते