Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांबू लागवडीसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 14:46 IST

बांबू हे हमखास पैसे देणारे पिक तर आहेच पण पर्यावरणासह जमिनीचा घसरलेला पोत पण त्यामुळे पुन्हा प्राप्त होणार आहे. बांबू हा बहुउपयोगी आहे.

शुक्रवारी लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय, बांबू टीश्यू कल्चर, बांबू फर्निचर प्रकिया उद्योगाच्या भेटीनंतर झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी फिनिक्स फाउंडेशनचे प्रमुख माजी आमदार पाशा पटेल, कृषी शास्त्रज्ञ अखिल रिझवी, लातूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे, कृषी विभागाचे अधिकारी, परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

राज्यातील शेतीचे आरोग्य नको त्या मात्रामुळे खराब झाले असून कर्बचे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणावर भर देणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेतली जाणार आहे. तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्रे अद्ययावत करून माती परीक्षणासाठी आता शेतकरी आपल्या मातीचा बॉक्स माती परीक्षण केंद्राचा पत्ता टाकून त्यावर त्याच्या मोबाईल नंबरसह सविस्तर माहिती देईल. मातीचे परीक्षण होऊन सात दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवर मातीच्या आरोग्याचा अहवाल येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे कृषिमंत्री  धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यात दिवसेंदिवस शेती पिकण्यासाठी आवश्यक असलेले कर्ब कमी होत आहे. हे असेच राहिले तर जमिनी उपजावू राहणार नाहीत. हे कर्ब वाढविण्यासाठी आता कृषी विभाग पुढाकार घेणार आहे. यापुढे माती परीक्षण करताना मातीची कोणत्या पिकासाठी योग्यता आहे, कोणत्या पिकासाठी नाही, कोणत्या पिकामुळे मातीचे कर्ब वाढेल ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, अशी माहिती कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितली.

बांबू हे पिक मातीचे आरोग्य वाढविणारे आहे याची जाणीव झाल्यामुळे लातूर आणि सातारा येथे प्रायोगिक तत्वावर होणारी बांबू लागवड आता बीडमध्येही केली जाणार आहे. तीन बाय सहाचा खड्डा आणि त्यात लागणारे बांबूच्या रोपासाठी प्रत्येकी पन्नास रुपये अनुदान दिले जाणार आहे. बांबूसाठी आता हेक्टरी सात लाख रुपये दिले जाणार असून राज्यात फळबागसाठी मनरेगातून जसे अनुदान दिले जाते तसे सर्व जिल्ह्यात बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बांबू लागवड चळवळ व्हावीबांबू हे हमखास पैसे देणारे पिक तर आहेच पण पर्यावरणासह जमिनीचा घसरलेला पोत पण त्यामुळे पुन्हा प्राप्त होणार आहे. बांबू हा बहुउपयोगी आहे. कितीही चांगले फर्निचर केले तर त्याचे आयुष्य १५ ते २० वर्ष असतं पण बांबूचे फर्निचरला १०० वर्ष काहीच होत नाही. त्यामुळे जगभर बांबूचा प्रत्येक गोष्टीसाठी वापर वाढतो आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात बांबू लागवडीची चळवळ व्हायला हवी. यापुढे आपणही या बांबू लागवडीच्या चळवळीचा कार्यकर्ता असेल असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगून अधिकाधिक शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी असे आवाहन केले. माजी आमदार पाशा पटेल यांनी बांबू, बांबूचे फायदे आपल्या प्रास्ताविकात सांगितले. बांबू विषयातले तज्ज्ञ संजीव करपे यांनी बांबूबद्दल वैज्ञानिक, व्यवहारिक मांडणी असलेले सादरीकरण केले.

टॅग्स :पीकशेतकरीशेतीधनंजय मुंडेपाशा पटेल