Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिलारीत ऐन काजूच्या हंगामात हत्तींचा कळप एकवटला; शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पायाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 14:46 IST

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सध्या निसर्गाचा कोप नाही, तर रानटी हत्तींचा अघोषित 'कर्फ्यू' सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून विखुरलेला हत्तींचा कळप आता पुन्हा एकत्रित झाला असून, त्यांनी आपला मोर्चा थेट काजू बार्गाकडे वळवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सध्या निसर्गाचा कोप नाही, तर रानटी हत्तींचा अघोषित 'कर्फ्यू' सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून विखुरलेला हर्तीचा कळप आता पुन्हा एकत्रित झाला असून, त्यांनी आपला मोर्चा थेट काजू बार्गाकडे वळवला आहे.

काजूच्या झाडांना आलेला मोहर आणि लागलेली फळे पाहून शेतकरी सुखावला होता, मात्र हत्तींच्या या 'कहरा'मुळे बागायतदारांच्या आर्थिक नियोजनाची पूर्णपणे कंबर मोडली आहे.

काजू हे या भागातील मुख्य नगदी पीक. मात्र, हत्तींचा हा धुमाकूळ र्थांबण्याचे नाव घेत नाहीये. रात्रीच्या गडद अंधारात १० ते १२ हत्तींचे हे कळप बागेत घुसतात आणि काही तासांतच कष्टानं फुलवलेली झाडं जमीनदोस्त करतात.

हत्ती केवळ फळे खात नाहीत तर डौलाने उभी असलेली झाडे मुळासकट उपटून टाकत आहेत. १०-१५ वर्षे मुलाप्रमाणे सांभाळलेली झाडे क्षणात नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.

हत्तींच्या या समस्येमुळे केवळ शेतीच नाही, तर शालेय मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारही विस्कळीत झाले आहेत. सायंकाळी ६ नंतर गावात 'कर्फ्यू लागल्यासारखी परिस्थिती असते. जर प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर तिलारीतील बागायतदार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

वनविभागाची 'कासव' गती; नुकसान भरपाईचा खेळ

वनविभागाचे अधिकारी येतात, पंचनामे करतात आणि निघून जातात. मात्र, मिळणारी नुकसान भरपाई ही नुकसानीच्या तुलनेत अगदीच नगण्य असते. सौर कुंपण आणि ट्रॅकर यंत्रणा हत्तींना रोखण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. प्रशासनाकडे कोणताही ठोस 'ॲक्शन प्लॅन' नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे

संकटाची मालिका : काजू गेला, आता भातही धोक्यात ?

• काजू बागांचे नुकसान झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना पुढच्या खरीप हंगामाचीही भीती वाटू लागली आहे.

• जर हत्तींचा हाच मुक्काम कायम राहिला, तर पावसाळ्यात लावणी केलेली भातशेतीही हे हत्ती फस्त करतील.

• एका संकटातून सावरण्यापूर्वीच दुसरे संकट समोर उभे असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी आटले आहे.

• आता गरज आहे ती केवळ आश्वासनांची, नाही तर कृतीची

गजराज की वनराज ? प्रशासनाचे कोडे

• केवळ हत्तींना हुसकावून लावणे हा उपाय नसून, त्यांच्यासाठी 'एलिफंट कॉरिडॉर' किंवा कायमस्वरूपी अडथळे निर्माण करण्याची गरज आहे. मात्र, दरवर्षी वनविभाग केवळ तात्पुरती मलमपट्टी करतो.

• हत्तींना नैसर्गिक अधिवासात रोखण्यात अपयश आल्याने त्याचा फटका थेट गरिबांच्या ताटातील घासाला बसत आहे. निसर्ग संवर्धन महत्त्वाचे आहेच; पण माणसाचा बळी देऊन का, असा संतप्त सवाल तिलारीवासीय विचारत आहेत.

बागायतदार हवालदिल

काजूला चांगला दर मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्जे काढली. बागेत खते, औषधे आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च केले. मात्र, हत्तीच्या उपद्रवामुळे आता हाताशी काहीच लागणार नाही, अशी चिन्हे आहेत. 'आम्हाला भीक नको, हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त द्या', अशी आर्त हाक बागायतदार मारत आहेत.

तिलारीतील हत्ती समस्येचा आलेख

घटक सद्य:स्थितीपरिणाम
नुकसणीचे स्वरूप६०% ते ८०% काजू बागाआर्थिक उत्पन्न शून्य
दहशतीचा काळसायंकाळी ६ ते पहाटे ६जनजीवन ठप्प
उपाययोजनातात्पुरते फटाके/आरडाओरडाहत्ती पुन्हा परततात
शेतकरी भावना तीव्र संताप आणि नैराश्यआंदोलनाचा इशारा

'काजूचा हंगाम सुरू झाला की घरात पैशांची आवक सुरू होते. पण यंदा हत्तींनी बागेचा 'स्मशान' करून टाकला आहे. मजुरांना द्यायला आणि कुटुंबाचे पोट भरायलाही आता पैसे उरले नाहीत. सरकारने आमचा गांभीर्याने विचार करावा.'- रघुनाथ पाटील, बागायतदार, तिलारी खोरे.

महेश सरनाईक उपमुख्य उपसंपादक सिंधुदुर्ग

हेही वाचा : शेतं संपून गेली तर माणसं काय खातील? गावोगावी शेतांची भासतेय कमतरता, घरांची मात्र पडतेय भर

English
हिंदी सारांश
Web Title : Elephant Herd Devastates Cashew Farms in Tilari During Harvest Season

Web Summary : A herd of elephants has wreaked havoc on cashew farms in Tilari, Dodamarg, devastating crops and livelihoods. Farmers face financial ruin as elephants destroy trees, leaving them helpless. Villagers demand permanent solutions from authorities to protect their farms and livelihoods. The destroyed cashew crops now threaten the upcoming rice harvest.
टॅग्स :सिंधुदुर्गशेती क्षेत्रशेतकरीशेतीवनविभागसरकार