Join us

वसमत मध्ये वाऱ्याचे धूमशान; केळी, पपई बागांचे होतेय नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 10:29 AM

अवकाळी संकट पाठ सोडत नसल्याने वसमत तालुक्यातील शेतकरी संकटात

एकीकडे अति तापमानामुळे केळी व पपईची झाडे जळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत असताना, दुसरीकडे सायंकाळच्या वेळेस वाहणाऱ्या वेगाच्या वाऱ्यामुळे पपई व केळीला मोठा फटका बसत आहे.

गत चार दिवसांपासून सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कुरुंदा, खुदनापूर, कवठा महमंदपुरवाडी, गुंज, गिरगाव, खाजनापुरवाडी, सोमठाणा, दाभडी या परिसरात जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. घड येण्याच्या स्थिती असलेल्या झाडांचीही पाने

फाटल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, कुरुंदा, गिरगाव, सोमठाणा, दाभडी, पार्डी बु. यासह आदी भागात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. आधीच केळीचे दर घसरले आहेत. त्यात मोठ्या तापमानामुळे केळीचे नुकसान होत आहे.

त्यात वाऱ्यामुळे आता केळीचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने नुकसान झालेल्या भागात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. केळीच्या झाडांसोबतच पपईच्या बागांनाही फटका बसत आहे.

येणारे पंधरा दिवस महत्त्वाचे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आगामी १५ दिवस महत्त्वाचे आहेत. कारण, मान्सूनच्या आगमनाआधी मान्सूनपूर्व पावसात मोठ्या प्रमाणात वादळाची शक्यता असते.

गेल्या अनेक वर्षांपासून जून महिन्यातील पहिला आठवडा व मे महिन्याचा शेवटचा आठवडा नुकसानीचा ठरत आहे. त्यामुळे आगामी १५ दिवस शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. त्यात गेल्यावर्षी झालेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

हेही वाचा - Animal Care नका भिजू देऊ गुरांना पावसात; आजारपणाची साथ घेऊन येईल आर्थिक हानी दारात

टॅग्स :वादळपाऊसहिंगोलीफळेशेतकरीशेतीशेती क्षेत्र