जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील रवंजे बु परिसरात पिकांना खतांची मात्रा देण्याची वेळ आली असताना शेतकऱ्यांना जादा दराने खते विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
रवंजे बु. येथील शेतकरी ज्ञानेश्वर भगवान कोळी यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. हा अनुभव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना येत आहे. मात्र खतच मिळणार नाही, या भीतीपोटी बहुतांश शेतकरी आर्थिक नुकसान सोसून जादा दराने खते खरेदी करतात.
खर्ची, रवंजे परिसरात कृषी केंद्रांवर शासन व कंपनीने ठरवलेल्या दरांपेक्षा जादा दराने रासायनिक खतांची विक्री केली जात आहे. यात काही दुकानदार पक्के बिले देतात तर काही साधी पावती देतात.
तर अनेक कृषी केंद्रांवर स्टॉक बोर्ड, रेट बोर्ड लावलेले दिसत नाहीत अथवा रेट बोर्डावर खतांचे भाव लिहिलेले दिसत नाहीत. शासनाचे नियम पायदळी तुडवत केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
..तर मराठा सेवा संघ करणार आंदोलन
चाळीसगाव तालुक्यात खतांचा अनियमित पुरवठा सुरु आहे. खतांचा काळाबाजार करण्यासाठी हा खेळ सुरु असून याविरोधात शेतकरी आक्रमक होतील. त्यामुळे कृषी विभागाने संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी. खतांचा सुरळीत पुरवठा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा चाळीसगाव मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
युरिया बॅग देताना इतर खते घेण्यासाठी जबरदस्ती
३०० रूपयांपर्यंत खताची एक बॅग मिळत आहे. ५० किलोच्या युरियाच्या एका बॅगेची किंमत ही २६६ रूपये आहे. मात्र एका बॅगेवरच विक्रेते ३४ रूपयांचा फायदा मिळवत आहेत.
रांगेत उभे राहण्याची वेळ
• चाळीसगाव तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा भासत असल्याने खासकरून युरियासाठी शासनाने निर्देशित केलेल्या दुकानांसमोर पहाटेपासून आधार कार्ड घेऊन शेतकरी बांधवांना केवळ दोन बॅगा घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येत आहे.
• रासायनिक खतांचा काळाबाजार अथवा साठवणूक करणाऱ्या दुकानदारांची कृषी विभागाने पारदर्शकपणे तपासणी करावी अथवा शासनाकडून वाढीव खतांची मागणी प्रशासनाने करावी, अशी मागणी करणारे निवेदन विविध पक्ष, संघटना तसेच शेतकऱ्यांच्या वतीने पंचायत समितीच्या कृषी विभागाला देण्यात आले.
• यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समाधान पाटील, वसंत चव्हाण, सुधीर पाटील, रयत क्रांती सेनेचे डॉ. अजय पाटील, राष्ट्रीय जनमंच पक्षाचे संदीप लांडगे, रामलाल चौधरी, संतोष राजपूत उपस्थित होते.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी