Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा संकेतस्थळावरूनच ६५७ विहिरींची कामे झाली अचानक गायब; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 10:09 IST

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत मंजूर झालेल्या ६५७ सिंचन विहिरींची कामे नरेगाच्या संकेतस्थळावरून अचानक बंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विहिरींचे खोदकाम पूर्ण केलेल्या लाभार्थीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

संतोष सारडा 

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) अंतर्गत जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात मंजूर झालेल्या ६५७ सिंचन विहिरींची कामे नरेगाच्या संकेतस्थळावरून अचानक बंद झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

यामुळे विहिरींचे खोदकाम पूर्ण केलेल्या लाभार्थीमध्ये मोठी खळबळ उडाली असून, हक्काच्या अनुदानासाठी शेतकरी आता पंचायत समितीचे उंबरठे झिजवत आहेत.

बदनापूर तालुक्यातील २०२३-२४ पूर्वी ६५७ सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी पदरमोड करून या विहिरींचे खोदकाम पूर्ण केले आहे.

या विहिरींसाठी ४ लाख रुपयांपर्यंत निधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. आता संकेतस्थळावरून या विहिरींची नोंदच रद्द करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

'या' गावांचा आहे समावेश

संकेतस्थळावर बंद करण्यात आलेल्या विहिरीमध्ये तालुक्यातील अन्वीराळा येथील १६ विहिरी, असरखेडा १०, असोला ४, बाजार वाहेगाव ४, बावणे पांगरी १, भाकरवाडी धनगरवाडी १८, भराडखेडा ८, भिलपुरी खुर्द ४, बुटेगाव २, चनेगाव १७, चिखली १८, चितोडा ४, दगडवाडी १, डावरगाव १३, देवगाव तांडा १०, देवपिंपळगाव ३, धामणगाव ९, ढासला ७, डोंगरगाव दा. ६, डोंगरगाव सा. ११, गेवराई बाजार २, हालदोला १३, हिवराराळा ४४, हिवरादाभाडी ५४, जवसगाव २, कडेगाव १०, काजळा पानखेडा ९, कंडारी बुद्रुक ४, कंडारी खुर्द २१, केळीगव्हाण ९, खडकवाडी ७, खादगाव ५, खामगाव ९, किन्होळा ६, कुंभारी ३. कुसळी ११, लक्ष्मणनगर ३, माळेगाव खुर्द १, मालेवाडी ५, मानदेऊळगाव १३, मांडवा १९, मांजरगाव १, मात्रेवाडी ३, मेव्हणा ८, म्हसला-भातखेडा १३. नजीक पांगरी ४, नांदखेडा १, नानेगाव ८, पाडळी-रामखेडा २, पठार देऊळगाव ७, पिरसावंगी २०, रांजणगाव ३, राजेवाडी खो. १७, राजेवाडी शे. १५, सागरवाडी १५, शेलगाव ४, सिंथी पिंपळगाव २०, शिरसगाव घाटी १, तळणी ६, तुपेवाडी २५, उज्जैनपुरी ३, वरुडी १४, विल्हाडी १७, वाघरूळ दा. ७, वाघरुळ डो. २, वाकुळणी २, वाल्हा ४, वंजारवाडी १९ अशा एकूण ६५७ सिंचन विहिरीचा समावेश आहे.

वृक्षलागवडीची कामेही बंद

• केवळ विहिरीच नव्हे, तर २०२३-२४ पूर्वीची तालुक्यातील सुमारे २०० ते २५० वृक्षलागवडीची कामे सुद्धा पोर्टलवरून बंद करण्यात आली आहेत. यामुळे पर्यावरणासह मजुरांच्या हाताला मिळणाऱ्या कामावरही गदा आली आहे.

• पंचायत समितीचा जिल्हा परिषदेला अहवाल तालुक्यातील १४७ लाभार्थीनी विहिरींची कामे प्रत्यक्ष सुरू केली आहेत. मात्र, ऑनलाइन पोर्टलवरून कामे बंद झाल्यामुळे या कामांचे 'मस्टर' काढण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत.

• मस्टर निघत नसल्याने मजुरांची देयके रखडली असून, लाभार्थी शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

• या संदर्भात बदनापूर पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे सविस्तर अहवाल पाठवून मार्गदर्शन मागविले आहे. आतापर्यंत याविषयीची माहिती पंचायत समितीकडे उपलब्ध झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

रोजगार हमी आयुक्तांकडे पाठपुरावा करणार

शेतकऱ्यांना सिंचनासाठी या विहिरी अत्यंत आवश्यक आहेत. तांत्रिक कारणास्तव किंवा अन्य कारणाने या विहिरींची कामे बंद करणे चुकीचे आहे. यासंदर्भात नागपूर येथील मनरेगा आयुक्तांशी त्वरित संपर्क साधून, या सर्व विहिरींची कामे पोर्टलवर पुन्हा सुरू करण्याची मागणी करणार आहे. - नारायण कुचे, आमदार, बदनापूर.

हेही वाचा : कडधान्य खाण्याची सुद्धा असते योग्य पद्धत! जाणून घ्या याच गुणकारी पद्धतीविषयी अधिक माहिती 

English
हिंदी सारांश
Web Title : 657 Well Works Vanish from MGNREGA Site, Farmers Agitated

Web Summary : 657 sanctioned well projects in Badnapur disappeared from the MGNREGA website, leaving farmers who completed digging without funds. Farmers are struggling as promised subsidies are not disbursed, causing financial distress. An investigation is underway.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसरकारी योजनामराठवाडा