अवघा एक रुपया तर भरायचा आहे म्हणून मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल चार लाख ९९ हजार २८० शेतकऱ्यांना एक दमडीही मंजूर झाली नाही. ७४ हजार शेतकऱ्यांना मंजूर ८२ कोटी रकमेसाठी देखील विमा कंपनीने वेटिंगवर ठेवले आहे.
खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा रक्कम भरताना शेतकऱ्यांनी अवघा एक रुपया भरण्याची राज्य शासनाने तरतूद केली होती. शेतकरी हिश्श्याची रक्कम राज्य सरकारने भरली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला. प्रति एक रुपया याप्रमाणे शेतकऱ्यांचे ७ लाख रुपये विमा कंपनीकडे जमा झाले.
विमा कंपनीकडून नुकसानभरपाई म्हणून दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी मंजूर केले आहेत. त्यातील ८२ कोटी अद्याप ७३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. मंजूर रकमेसाठीही शेतकऱ्यांना वेटिंगवर ठेवले आहे. एकीकडे मंजूर रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसताना तब्बल पाच लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे. म्हणजे या पाच लाख शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून एक दमडीही मिळणार नाही.
संरक्षित रक्कम कशासाठी ?
विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी विमा भरल्यानंतर केंद्र व राज्य शासन त्यांचा हिस्सा विमा कंपनीकडे जमा करते. त्याच्या आधारे विमा कंपनी संरक्षित रक्कम अंतिम करते. मागील वर्षीच्या खरीप हंगामाची संरक्षित रक्कम २०८१ कोटी इतकी आहे. प्रत्येक तालुक्याची संरक्षित रक्कम कोट्यवधी असून, वेगवेगळी आहे. अशी संरक्षित रक्कम खरीप व रब्बी हंगामात असते.
जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला सांगितले आहे. जवळपास ८२ कोटी मंजूर असलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पाच लाख अर्ज अपात्र झालेत. त्याची कारणे कंपनीला सांगावे लागेल. त्यानंतरच पीक विमा संदर्भात निर्णय घेता येईल. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
तालुक्याचे नाव | सहभागी शेतकरी | मंजूर शेतकरी | मंजूर रक्कम |
अक्कलकोट | १००९१२ | ३८३९७ | ४३ |
बार्शी | ११५७५२ | ८९९९० | ११४ |
करमाळा | १०४३९७ | १२६७९ | ०.९ |
माढा | १०६५०९ | २२८०० | १४ |
माळशिरस | ४२३४५ | १५२८ | १.४१ |
मंगळवेढा | ६३१०१ | २७०३९ | १४.२८ |
मोहोळ | ३०७६ | ७८५६ | २२ |
पंढरपूर | ९४०५ | ९५१ | २.२८ |
सांगोला | ८७४३७ | ३२१० | ५.४८ |
उ. सोलापूर | २३२२८ | १२५१९ | ३५ |
द. सोलापूर | ५४३३३ | २०४४४ | १८.३७ |
एकूण | ७३८१८३ | २३८९०३ | २७९ |
(सहभागी व मंजूर शेतकरी संख्या तर मंजूर रक्कम ही कोटीमध्ये आहे)
हेही वाचा : तुम्ही पित असलेल्या पाण्याचा टीडीएस योग्य नसेल तर उद्भवू शकतो आजार? वाचा सविस्तर