Join us

'एफआरपी'त १८ टक्के पण खर्चात ४० टक्क्यांची वाढ; सांगा उसाचे अर्थकारण कसे जुळायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:58 IST

Economics Of Sugarcane Farming : गेल्या पाच वर्षांत उसाच्या आधारभूत किमतीमध्ये प्रतिटन ६५० रुपयांची वाढ झाली असली, तरी त्यापेक्षा दुपटीने खर्च वाढला आहे. यामधून प्रतिटन ३०० रुपये वाढीव ऊस तोडणी व वाहतूक खर्च गेला आहे.

राजाराम लोंढे 

गेल्या पाच वर्षांत उसाच्या आधारभूत किमतीमध्ये प्रतिटन ६५० रुपयांची वाढ झाली असली, तरी त्यापेक्षा दुपटीने खर्च वाढला आहे. यामधून प्रतिटन ३०० रुपये वाढीव ऊस तोडणी व वाहतूक खर्च गेला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात केवळ तीनशे रुपयेच पैसे पडले. त्यातून खतांच्या किमतीत ३५, तर मशागतीपासून ऊस तोडणीपर्यंत तब्बल ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीनुसार दरवर्षी ऊसाची निर्धारित किंमत निश्चित केली जाते. शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी येणारा खर्च पाहून हा दर निश्चित केला जातो.

पण, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा शेती उत्पादन खर्चाबाबत काहीसा चुकीचा ठरत आहे. यावर्षी त्यांनी टनाला १७३० रुपये खर्च पकडला आहे. पण, प्रत्यक्षात हा खर्च २२०० ते २३०० रुपयांपर्यंत जातो. त्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडलेले आहे.

युरियासारख्या स्वस्त खतातही मखलाशी

• शेतकऱ्यांच्या आवाक्यात असलेले एकमेव खत म्हणजे युरिया आहे. पन्नास किलोची बॅग शेतकऱ्यांना २६७ रुपयांना मिळत होती. पण, काही कंपन्यांनी निमकोटेड युरियाच्या नावाखाली दर तोच ठेवून वजन ४५ किलो केले.

• म्हणजेच, अप्रत्यक्षपणे किलो मागे ६० पैशांची वाढ केली. आतातर सल्फर कोटिंग युरिया त्याच दरात ४० किलोची बॅग विकत आहेत. काही कंपन्या, तर वजन कमी करून दरही वाढवत आहेत. यावर, कोणाचाही अंकुश नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.

उसाचे बियाणेही महागले

रोपे लागणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पाच वर्षापूर्वी वाणानुसार एका रोपाची किंमत सरासरी १ रुपये २० पैसे होती. किंमत आता २ रुपये ५० पैशांपर्यंत वाढली आहे.

असे वाढत गेले दर

खतपाच वर्षांपूर्वीचे दर सध्याचा दर
इफको११७०१७२५
संपुर्णा१२००१९००
१४:३५:१४११९०१८००
सुफला११४० १६५० 

उत्पादन खर्च काढताना कुटुंबाची मजुरी, घसारा पकडून काढली पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे येतील. - शिवाजी माने (नेते, जय शिवराय संघटना).

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :ऊसशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारसरकारसाखर कारखाने