लातूर जिल्ह्याच्या उदगिरात बर्ड फ्लूमुळे ६४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली असताना ढाळेगाव (ता. अहमदपूर) येथे ४ हजार २०४ कोंबड्यांची पिले मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोल्ट्रीफार्म मालकांबरोबर पशुसंवर्धनाची धास्ती वाढली आहे. दरम्यान, कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत.
ढाळेगाव येथील सचिन गुळवे यांचे पोल्ट्रीफार्म आहे. त्यांनी १५ जानेवारी रोजी कोंबड्यांची ४,५०० पिले आणली होती. रात्री शेडमध्ये पिले सोडली असता अचानक वीज गेली. त्यामुळे तापमानात बदल झाला. तद्नंतर १६ ते २३ जानेवारीदरम्यान ४ हजार २०४ पिल्ले दगावली.
उदगिरात बर्ड फ्लूमुळे कावळे दगावल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री चालकांना नोंदणीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डॉ. श्रीराम गायकवाड हे बुधवारी नोंदणीसाठी ढाळेगाव येथे गेले असता पिले दगावल्याचे निदर्शनास आले.
साडेतीन लाखांचे नुकसान
● पोल्ट्री मालक सचिन गुळवे म्हणाले, मी ४,५०० कोंबड्यांची पिले आणली होती. त्यातील ४,२०४ पिले दगावली. त्यात साडेतीन लाखांचे नुकसान झाले असून, भरपाई मिळावी, अशी मागणी केली.
● अचानकपणे कोंबड्यांची मृत्युमुखी पडल्यामुळे गुरुवारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. यू. बोधनकर, जिल्हा सर्व पशू चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुधाकर साळवे, डॉ. शिवाजी क्षीरसागर, डॉ. सुयोग येरोळे, डॉ. श्रीराम गायकवाड यांनी तात्काळ दाखल होऊन पाहणी केली. तसेच पोल्ट्री मालकाला निर्जंतुकीकरणाच्या सूचना केल्या.
नागरिकांनी घाबरू नये
उदगीर घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातून दोन-दोन कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. - अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
नमुने प्रयोगशाळेकडे
वीजपुरवठा बंद झाल्याने घाबरून आणि एकमेकांना तुडविले गेल्याने कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला असावा, बर्ड फ्लूसारखी लक्षणे दिसत नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून काही पक्ष्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होईल. - डॉ. श्रीधर शिंदे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन.