हिंगोली : ग्रामीण भागातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 'परसातील कुक्कुटपालन' हे केवळ उपजीविकेचे साधन नसून आर्थिक सक्षमीकरणाचा एक प्रभावी मार्ग ठरत आहे, असा निष्कर्ष कृषी विज्ञान केंद्र (KVK), तोंडापूर जि. हिंगोली यांनी केलेल्या एका विशेष अभ्यास पाहणीतून समोर आला आहे.
संशोधनाचा तपशील : केव्हीके हिंगोलीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, डॉ. गीते कैलास आणि डॉ. मुराई अतुल यांनी २०२१-२२ या काळात कळमनुरी तालुक्यातील वरुड, जामगव्हाण, बऊर, झुणझुनवाडी, डोंगरकडा आणि वारंगा या गावांमध्ये हे संशोधन केले. या अभ्यासात ३० कुक्कुटपालन करणाऱ्या लाभार्थ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक बदलांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रमुख निष्कर्ष :
महिलांचा सहभाग : संशोधनात सहभागी असलेल्या लाभार्थ्यांपैकी ५३.३३ टक्के महिला असून, या व्यवसायामुळे महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे.
उत्पन्नाचा विनियोग : ७६.६६ टक्के लाभार्थ्यांनी कुक्कुटपालनातून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर शेती कामासाठी केला, तर ५३.३३ टक्के लाभार्थ्यांनी पुन्हा कुक्कुटपालन व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या निधीचा वापर केला.
प्रगत जातींचा वापर : पारंपारिक गावरान पक्ष्यांच्या तुलनेत केव्हीकेने शिफारस केलेल्या 'ग्रामप्रिया' या सुधारित जातीमुळे अंडी उत्पादन आणि वजन वाढीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
सक्षमीकरण : सुमारे ८० टक्के लाभार्थ्यांनी या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्याचे आणि आत्मविश्वास वाढल्याचे मान्य केले आहे.
तंत्रज्ञानाचा प्रसार: कृषी विज्ञान केंद्राने लाभार्थ्यांना सुधारित पक्ष्यांसोबतच लसीकरण, शास्त्रीय खाद्य व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणाचे तांत्रिक प्रशिक्षण दिले आहे. यामुळे ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होऊन गरिबी निर्मूलनास मदत होत असल्याचे डॉ. पी. पी. शेळके यांनी नमूद केले आहे.
परसातील कुक्कुटपालन हे हिंगोली जिल्ह्यातील पावसावर आधारित शेती असलेल्या भागातील लोकांसाठी दैनंदिन रोख उत्पन्न देणारा शाश्वत पर्याय म्हणून पुढे येत आहे.
Web Summary : Hingoli's KVK study reveals backyard poultry empowers women, boosts income for farmers, especially with improved breeds like Gramapriya. Training in vaccination and management further enhances self-employment and poverty reduction in rain-fed areas, providing daily income.
Web Summary : हिंगोली के केवीके अध्ययन से पता चलता है कि पिछवाड़े कुक्कुट पालन महिलाओं को सशक्त बनाता है, किसानों के लिए आय बढ़ाता है, खासकर ग्रामप्रिया जैसी बेहतर नस्लों के साथ। टीकाकरण और प्रबंधन में प्रशिक्षण वर्षा आधारित क्षेत्रों में स्व-रोजगार और गरीबी में कमी को और बढ़ाता है, जिससे दैनिक आय होती है।