पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढलेला असतो. तसेच पक्ष्यांवर ताण येतो आणि पक्षांच्या व्यवस्थापनाच्या कामांचाही ताण वाढलेला असतो. कुक्कुट खाद्यातील आर्द्रतेचे प्रमाण वाढते, त्यामुळे त्याचा दर्जा खालावण्याची शक्यता असते.
या सर्व बाबींचा पक्ष्यांच्या रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होऊन श्वास/अन्ननलिकेच्या रोगांचे प्रमाण वाढते किंवा मर्तुक दिसून येते. अंडी उत्पादन घटते. यासाठी नेहमीपेक्षा जास्त दक्षतेने कुक्कुटपालकांनी पक्षांची देखरेख करणे गरजेचे आहे.
अशी घ्या काळजी◼️ पावसाळा सुरू होण्यापूर्वी पक्षी घरांची डागडुजी करणे आवश्यक आहे.◼️ पक्षीगृहाच्या शेडची दुरूस्ती करणे, पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जाईल याची खात्री करणे, छतास छिद्र असतील तर ती बुजवणे.◼️ पक्षीगृहाच्या दारांची आवश्यक असल्यास दुरूस्ती करून घेणे, पक्षीगृहाच्या आसपास पावसाचे पाणी न साचता वाहून जावे यासाठी ड्रेन तयार करावीत.असल्यास त्यांची दुरूस्ती करून घेणे.◼️ पावसाचे पाणी पक्षी गृहात येऊ नये म्हणून आवश्यक पडद्यांची सोय करावी.◼️ गादी पद्धतीने संगोपन करण्यात येत असलेल्या पक्षीगृहातील गाद्यांचे तुस बदलावयाचे असल्यास बदलून घेणे किया त्यास पलटवून घेणे.◼️ गरज असल्यास गादीसाठी अंथरलेल्या तूस अथवा तत्सम पदार्थात योग्य प्रमाणात चुन्याची फक्की मिसळून घ्यावी, जेणेकरून ओलावा कमी राहील.
कुक्कुटपालकांनी पावसाळ्यात ह्या बाबींकडे लक्ष्य द्या◼️ पावसाळ्यात पक्षीगृहातील आर्द्रता वाढून अमोनियाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते. यासाठी पक्षीगृह कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करावा.◼️ पक्षांचे खाद्य भिजणार नाही याची दक्षता घ्यावी, पक्षी खाद्याची साठवण कोरड्या जागेत करावी.◼️ पावसाळ्यात जास्त पक्षी खाद्य खरेदी करून साठवण करण्यात येऊ नये.◼️ पक्षीखाद्य साठवताना जमिनीपासून वर प्लॅटफॉर्मवर ठेवण्याची सुविधा करावी, जेणेकरून जमिनीतील ओलाव्यामुळे पक्षीखाद्यास बुरशी लागणार नाही व त्याचा दर्जा टिकून राहील.◼️ पक्षांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा दर्जा योग्य नसल्यास कॉक्सिडीओसिस, इकोलाय, मायकोटॉक्झीन विषबाधा आणि श्वसनाचे रोग होण्याची शक्यता असते.◼️ त्यामुळे पक्ष्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे. तसेच त्यात मेडीक्लोर योग्य प्रमाणात मिसळावे, गरजेनुसार अॅसिडीफायरही वापरावेत.◼️ पावसाळ्यात तापमानात फरक पडल्यामुळे पक्षी पाणी कमी पितात. तसेच गर्दी करतात. या बदलांमुळे उत्पादन घटण्याची शक्यता असते.◼️ पावसाळ्यात तापमान कमी असल्यास उर्जेची गरज भागविण्यासाठी पक्षी जास्त खाद्य घेतात. त्यामुळे खाद्यावरील खर्च वाढू शकतो.◼️ यासाठी शक्य असल्यास पोषण तज्ज्ञांच्या सल्ल्याने खाद्यात आवश्यक बदल करून घ्यावा व पक्षीखाद्य उपलब्धता किफायती ठेवण्याचा प्रयत्न करावा.◼️ परसातील कुक्कुटपालनाद्वारे मुक्त पद्धतीने संगोपन करण्यात येणाऱ्या पक्षांसाठी अतिरिक्त पशुखाद्य देणे गरजेचे असते.◼️ तसेच कोमट पिण्यायोग्य पाणी पिण्यास देणे आवश्यक आहे, जेणेकरून पक्ष्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहील.◼️ मुक्त वावरणाऱ्या पक्षांचा संपर्क पावसाने साचलेल्या पाण्याशी येऊ शकतो किंवा हे साठलेले पाणी पक्षी पिऊ शकतात ज्यामुळे जंतुसंसर्ग, कृमींची बाधा होण्याची शक्यता असते.
अधिक वाचा: शेतजमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद होणार कमी; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा नवा निर्णय