Join us

Bird Flu : बर्ड फ्लू ग्रस्त साडेचारशे कोंबड्या केल्या नष्ट; राज्याच्या 'या' परिसरात अलर्ट मोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:07 IST

Bird Flu : ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावात बर्ड फ्लूची लागण झाल्याचा प्रकार राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोगसंस्थेकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले.

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावात बर्ड फ्लूची लागण झाल्याचा प्रकार राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोगसंस्थेकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले.

दरम्यान, बुधवारी (दि. ५) सकाळी जिल्हा पशुसंवर्धन विभागाची चमू गावात दाखल झाली असून एक किलोमीटर परिसरातील प्रभावित पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनीही गावाला भेट दिली आहे.

मांगली गावाजवळील एका फार्म हाऊसमध्ये गावरान कोंबड्या पाळण्यात आल्या. कुठलीही लागण झाल्याचे चिन्ह नसताना दररोज कोंबड्यांचा मृत्यू होत होता. मालकाने तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले असता मृत कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी (दि. ४) प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून बुधवारी सकाळपासून मरतूक कोंबड्या पकडून नष्ट करण्यात येत आहेत.

लर्ट झोन घोषित

फार्म हाऊस परिसरातील १० किलोमीटरपर्यंतचा परिसर ॲलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. पुढील तीन चार दिवस या परिसरात चमू दाखल राहणार असून बर्ड फ्लूची लागण झालेले सर्व मरतूक नष्ट करण्यात येणार आहेत. आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कुक्कुट पालन करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर मोठे संकट आले आहे. शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

मानवी आरोग्यास धोका नाही

मांगली येथील ३००, गवराळा येथील ५०, जुगनाळा १०० कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. पक्ष्यांपासून मानवास लागण झाल्याचा प्रकार अद्याप भारतात घडलेला नाही. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले.

मांगली गावात एका फार्म हाऊसमध्ये कोंबड्यांचा अचानक मृत्यू होत होता. पशुसंवर्धन विभागाने पुणे, भोपाळ येथे नमुने पाठविले. त्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. मांगली, गवराला (चक), जुगनाळा येथील कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. मांस, अंडी ७० डिग्री तापवून खावे, नागरिकांनी घाबरू नये. - डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त चंद्रपूर.

हेही वाचा : बाजारात शेतमालाला दर नाही मग विकू नका; शेतमाल तारण ठेवून 'असा' घ्या अधिकचा फायदा

टॅग्स :बर्ड फ्लूविदर्भपोल्ट्रीशेती क्षेत्रशेतकरीशेती