Join us

Melghat Fishing : मेळघाटातील मासेमारी; परंपरेतून उपजीविकेचा नवा मार्ग वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:53 IST

Melghat Fishing : मेळघाटातील आदिवासी समाजासाठी मासेमारी हा केवळ छंद नाही, तर उपजीविकेचं साधन आहे. पावसानंतर ओसंडून वाहणाऱ्या नदी-नाल्यांमध्ये कुटुंबासह निघणारे आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने मासे पकडतात. याच माध्यमातून त्यांना रोजीरोटी आणि आनंद दोन्ही मिळतो. (Melghat Fishing)

नरेंद्र जावरे

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या मेळघाट परिसरातील नदी-नाल्यांमध्ये सध्या आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात मासेमारी करताना दिसत आहेत. पावसाळ्यानंतर अवकाळी पाऊस पडल्याने नद्या-नाले ओसंडून वाहू लागले असून, मासेमारीचा हंगाम जोरात सुरू आहे. (Melghat Fishing)

मासेमारी ही येथे केवळ छंद नसून, ती अनेक कुटुंबांसाठी रोजगाराचे साधन बनली आहे. (Melghat Fishing)

छंदातून उपजीविकेचा मार्ग

धारणी, चिखलदरा आणि अचलपूर तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये दरवर्षी या काळात अशीच हालचाल दिसते. सकाळपासूनच गावातील स्त्री-पुरुष, लहान मुले, तरुण मंडळी गळ, टोपले, कुकरी घेऊन नदीकाठावर निघतात. 

पारंपरिक पद्धतीने मासे पकडून काही स्वतःसाठी वापरतात, तर काहींना मिळालेली जास्त मासळी जागेवरच विकली जाते. यामुळे घरगुती खर्चाला हातभार लागतो.

पिढ्यानपिढ्याचालत आलेली परंपरा

मासेमारी हा मेळघाटच्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे चालत आली आहे. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुले सर्वजण या कामात सहभागी होतात. या प्रक्रियेतून त्यांना केवळ अन्न मिळत नाही, तर एकत्र येण्याचा आनंदही मिळतो.

पावसानंतर नद्या भरल्यावर मासे सहज उपलब्ध होतात, त्यामुळे या काळात अनेक पाड्यांमध्ये सामूहिक मासेमारी हा एक छोटा उत्सवच वाटतो.

पर्यटकांसाठी आकर्षण बनले मासेमारी दृश्य

मेळघाटात दरवर्षी हजारो पर्यटक जंगल सफारी, वन्यजीव दर्शनासाठी येतात. अशावेळी नदीकाठावर चालणारी आदिवासींची पारंपरिक मासेमारी पाहून ते थक्क होतात. 

स्थानिक पद्धतीने तयार केलेले जाळे, हाताने तयार केलेली साधने आणि चातुर्याने वापरलेली गंजा, कापडं, दगडं यामुळे मासेमारी एक वेगळी कलाच भासते. काही पर्यटक स्थानिकांनी पकडलेले मासे तिथेच विकत घेतात, त्यामुळे गावकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते.

व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील मर्यादा

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा बहुतांश भाग या नदी-नाल्यांमधून जातो. त्यामुळे या परिसरात वन्यजीव संरक्षणाचे नियम कडक आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत जाऊन मासेमारी करणाऱ्यांवर कधी कधी गुन्हे दाखल झाल्याचेही प्रकार घडतात. वनविभागाकडून जनजागृती केली जात असून, नियमांचे पालन करूनच मासेमारी करावी असे आवाहन केले जाते.

आगळ्या पद्धतीने मासेमारी

आदिवासी समाज पारंपरिक पद्धतीने मासे पकडतो. खेकडे पकडून एका गंजात ठेवतात, त्यावर कापड टाकून त्याला छिद्र करतात आणि ते नदीच्या पाण्यात रोवतात. काही वेळाने लहान मासे त्यात अडकतात. या स्थानिक उपाययोजनेत तंत्रज्ञान नसले तरी चातुर्य आणि अनुभव आहे.

शासनाची मत्स्यबीज योजना

मेळघाटात एक काळ असा होता, जेव्हा शासनाने कुपोषणावर मात करण्यासाठी अनेक तलावांमध्ये मत्स्यबीज सोडले होते. त्यामुळे स्थानिकांना विनामूल्य मासेमारीचा लाभ मिळत होता. हा उपक्रम पुढे अधिक विस्तारला, तर आदिवासी कुटुंबांसाठी तो स्थिर रोजगार ठरू शकतो.

अवैध पद्धतींनी धोका वाढतो

काही ठिकाणी मासेमारीसाठी गावठी स्फोटके किंवा युरिया वापरण्याचे प्रकारही समोर आले आहेत. या पद्धतीमुळे मासे तर पकडले जातात, पण त्याचबरोबर पाण्यातील जैवविविधता आणि पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो. या विरोधात वनविभागाने कठोर कारवाई सुरू केली आहे.

पर्यावरणपूरक व कायदेशीर मासेमारीची गरज

परंपरा जपून, पर्यावरणाचे संतुलन राखून मासेमारी करणे ही आजची गरज आहे. शासन आणि स्थानिक संस्था एकत्र येऊन प्रशिक्षण, मत्स्यपालन तलावांची निर्मिती, पर्यावरणपूरक साधनांचा वापर या माध्यमातून आदिवासी समाजाला शाश्वत मार्गावर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मासेमारी आमच्या जीवनाचा भाग आहे. पण निसर्गाचं रक्षण करूनच आपला छंद आणि रोजगार टिकवायचा आहे, असे स्थानिक मासेमारी करणारे आदिवासी सांगतात.

मेळघाटातील नदी-नाल्यांमध्ये चालणारी ही मासेमारी ही केवळ एक छंदाची गोष्ट नाही, तर ती आदिवासींच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. पारंपरिक पद्धती, आत्मनिर्भरता आणि निसर्गाशी असलेले नाते या सगळ्याचा संगम या जीवनशैलीत दिसतो. 

जर शासन, समाज आणि स्थानिक मिळून या परंपरेला योग्य दिशा दिली, तर ही मासेमारी मेळघाटच्या अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा मजबूत पाया ठरू शकते.

हे ही वाचा सविस्तर : Mushroom Farming Success Story : मातीतलं सोनं: गेवराईच्या माउली सगळेंनी मशरूम शेतीत घडवला 'चमत्कार'

English
हिंदी सारांश
Web Title : Melghat Fishing: Tradition fuels livelihood in tribal region, attracts tourists.

Web Summary : Melghat's tribal communities thrive on fishing, blending tradition with livelihood. Families engage in sustainable practices, attracting tourists. Forest regulations and alternative methods pose challenges. Government initiatives aim for stable income and environmental balance, ensuring a future rooted in nature.
टॅग्स :शेती क्षेत्रमच्छीमारमच्छीमारशेतीमेळघाटनदी