Fish Farming : मत्स्यपालन आणि मत्स्य संवर्धन मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं आहे. कारण मासे खाणारांची संख्याही वाढू लागली आहे. इथे आज आपण दोन प्रमुख माशांबद्दल बोलणार आहोत, हे दोन्ही मासे प्रसिद्ध असले तरी एकाच्या संवर्धनावर बंदी आहे तर दुसरा लोकप्रिय असूनही धोकादायक मानला जात आहे. जाणून घेऊयात या दोन माशांबद्दल...
विदेशी मागूर :
हा मासा मांसाहारी असून पाण्यातील नैसर्गिक व जलीय परिसंस्था आणि तेथील जैवविविधतेसाठी अत्यंत घातक आहे. संशोधनातून असे अवगत झाले आहे की हा मासा किडे, शिंपले, खेकडे, झिंगे, मासे, गांडूळ, पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, मेलेले पशुपक्षी इत्यादी प्रकारचे भक्ष खाऊ शकतो. तसेच विदेशी मागूर हा पाण्यातील प्राणवायू सोबत हवेतील प्राणवायू घेऊन सुद्धा जिवंत राहू शकतो.
यामुळे हा मासा एका जलाशयातून दुसऱ्या जलाशयामध्ये सरपटत जाऊ शकतो. विदेशी मागूर नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये राहू शकतो तसेच प्रजननक्षम होऊ शकतो व लाखोंच्या संख्येमध्ये अंडी देऊ शकतो. मागूरच्या बिजाच्या जगण्याचा व वाढण्याचा दर हा स्थानिक माशांपेक्षा अधिक आहे. म्हणजे हा मासा विशिष्ट खाद्यावर अवलबून नाही.
या माशाचा नैसर्गिक भक्षक व प्रतिस्पर्धी मासा हा भारतातील जलाशयांमध्ये नसल्याकारणाने नैसर्गिकरीत्या वाढीवर नियंत्रण होत नाही. या सर्व गुणधर्मामुळे व कारणांमुळे हा मासा भारतातील स्थानिक मत्स्य प्रजातींपेक्षा जास्त फोफावू शकतो.
तिलापीया :
हा जगातील दूसऱ्या क्रमांकाचा मत्स्य संवर्धन करण्यायोग्य मासा आहे. तिलापीया माशांच्या अनियमित प्रजनन क्षमतेमुळे एकाच तलावात वेगवेगळ्या वयाच्या आणि आकाराच्या तिलापीया माशांचे संवर्धन करणे हे एक मोठे आव्हान आहे. मादी तिलापीयाच्या तुलनेत नर तिलापीया माशाची खूप लवकर वाढ होते आणि त्याचे वजनही चांगले असते.
मादी तिलापीयाला वेगळे करून नर तिलापीयाची वाढ करणे याला मोनोसेक्स तिलापीया मत्स्य संवर्धन म्हणतात. जनुकीय सुधारीत तिलापीया गिफ्ट (Genetically Improved Farmed Tilapia) ची संवर्धन करण्याकरीता काही मार्गदर्शक तत्वांसोबत मंजूरी मिळालेली आहे. तिलापीयाचे व्यावसायिक मत्स्यसंवर्धन सुरू करण्याआधी मत्स्य संवर्धन/मत्स्य व्यवसाय विभागाची मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे राज्यशासनाचा परवाना घेण्याची गरज आहे.
गोड्या पाण्यातील जलक्षेत्राचा पुरेपूर उपयोग केल्यास आणि त्यामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने मत्स्यसंवर्धन केल्यास राज्याच्या मत्स्योत्पादनात भरीव वाढ होऊ शकेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होईल. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यसंवर्धन केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते.
सद्यस्थितीत उपलब्ध गोड्या पाण्यातील जलाक्षेत्रापैकी फारच कमी क्षेत्राचा उपयोग मत्स्यसंवर्धन करण्यासाठी केला जातो. मोठ्या जलाशयात किंवा वाहत्या पाण्यात मत्स्यबीज मोठ्या प्रमाणत सोडले तरी सोडलेले मासे पकडणे कठीण असल्यामुळे अपेक्षित मत्स्योत्पादन मिळत नाही. म्हणून लहान जलाशयाचा पुरेपूर वापर मत्स्यसंवर्धनासाठी करावा.
- महेश शेटकार, पदव्युत्तर विद्यार्थी, मत्स्यजीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी
- स्वप्नील घाटगे, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर
