Join us

AI In fish Farming : मत्स्यव्यवसायात एआय तंत्रज्ञानाचा वापर, महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 20:40 IST

AI In fish Farming : महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय (Fish Farming) क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या युगात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय (Fish Farming) क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या युगात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाच्या मदतीने जलाशयांचे व्यवस्थापन, मत्स्यसंवर्धन आणि माहिती संकलनासाठी ‘स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम’ (Smart Fish Stock Assessment System – SFSS) तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.

या करारावर स्वाक्षरीचा कार्यक्रम मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. या करारानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून जलाशयांची माहिती व त्यांचे सर्वेक्षण, मत्स्य उत्पादनाची अचूक आकडेवारी तयार करणे, मच्छींच्या साठ्याचे परीक्षण (Stock Assessment), विविध प्रकारच्या माहितीचे डिजिटल संकलन, मच्छीमारांना माहिती व सल्ला देणाऱ्या प्रणालींचा विकास या सर्व गोष्टी अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रमकृत्रिम बुद्धीमत्ता आधारित ‘स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम’ हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात प्रथमच राबविण्यात येणार आहे. यामुळे जलाशयांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल तसेच शाश्वत मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने धोरणे आखणे सुलभ होईल.

या उपक्रमामुळे मच्छीमारांना योग्य मार्गदर्शन मिळणार असून, उत्पादन वाढीबरोबरच जलसंपत्तीचे संवर्धनही साधता येणार आहे. मत्स्यव्यवसायामध्ये विज्ञानाधारित निर्णय प्रक्रिया राबवण्याची ही महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.

यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. यामुळे पारंपरिक मत्स्यव्यवसायाला नवे बळ मिळेल आणि शेतकरी व मच्छीमारांना आधुनिक व्यवस्थापनाची जोड मिळेल.”

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनामहाराष्ट्र