Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर खनिजे असलेला काटे विरहित निवडुंग ठरतोय गुरांच्या चाऱ्यासाठी फायद्याचा पर्याय; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:52 IST

काटे विरहित निवडुंग हा चाऱ्यासाठी चांगला पर्याय सध्या पुढे येत आहे. विविध प्रकार आणि आकार असलेल्या निवडुंगाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी बहुतांशी प्रजातीमध्ये काटे आणि जाड त्वचा असते. परंतु काही निवडुंगाला काटे नसतात त्यांना काटे विरहित निवडुंग असे म्हणतात.

काटे विरहित निवडुंग हा चाऱ्यासाठी चांगला पर्याय सध्या पुढे येत आहे. विविध प्रकार आणि आकार असलेल्या निवडुंगाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी बहुतांशी प्रजातीमध्ये काटे आणि जाड त्वचा असते. परंतु काही निवडुंगाला काटे नसतात त्यांना काटे विरहित निवडुंग असे म्हणतात.

या पानाच्या दोन्ही बाजूस कोंब असतात, त्यापासून नवीन पाने येतात. पानांवर पाने अशी रचना असून पानांमध्ये ८० टक्के पाणी असते. निवडुंग हे अतिशय प्रतिकूल, दुष्काळी भाग अति उष्णता आणि थंडी अशा परिस्थितीमध्ये तग धरून राहते म्हणजेच त्याची कमी पाऊस मान किंवा मुरमाड, नापीक, पडीक जमिनीमध्ये सुद्धा लागवड करून उत्तम प्रकारे चारा उत्पादन घेता येते.

तसेच लागवडी व्यवस्थापनासाठी अत्यंत कमी मनुष्यबळ व देखभाल खर्च लागतो. निवडुंगाच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम इत्यादी खनिज भरपूर प्रमाणात तर तंतुमय पदार्थ १४ टक्के, जीवनसत्वे आणि विविध खनिजे मध्यम प्रमाणात आहेत. म्हणून काटे विरहित निवडुंग चाऱ्यासाठी वापर करता येतो. 

जमीन व हवामान

या चारा पिकास कडक उन्हाळा आणि कोरडा हिवाळा असे हवामान चांगले असते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये येणारे पीक असल्यामुळे नापीक किंवा पडीक जमिनीत घेता येते. परंतु अधिक उत्पादनासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी डोंगर उताराची अथवा मुरमाड जमिनीची निवड करावी. 

लागवडीचा हंगाम

निवडुंग लागवड साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात लागवड करावी कारण या हंगामामध्ये निवडुंगाची जास्तीत जास्त पाने जगतात.

सुधारित वाण

कॅक्टस चारा पीक लागवडीसाठी १२७०,१२७१,१२८० आणि १३०८ या सुधारित वाणांची निवड करावी. सदरील वाण हे चारा पैदासकार, चारा पिके व उपयोगिता प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे देखील पाने/बेणे उपलब्ध आहे. 

लागवड पद्धती

कॅक्टस चारा पिकाची लागवड शक्यतो बेडवर करावी. जेणेकरून पाणी साचणार नाही. लागवडीसाठी दोन ओळीतील अंतर दोन मीटर आणि दोन रोपातील अंतर एक मीटर ठेवून एक बाय एक फूट आकाराचा अर्धा फूट खोल खड्डा भरावा. आपणास जर कॅक्टस चारा पिकाची लागवड ठिबक सिंचनावर करावयाचे असल्यास १ बाय ०.६० मीटर अंतरावर करावी.

लागवडीसाठी तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये साधारणपणे एक किलो चांगले कुजलेले शेणखत मातीमध्ये मिसळून टाकावे. लागवड करताना सुकविलेला पानांचा पसरट भाग पूर्व पश्चिम ठेवून लागवड करावी. तसेच लागवड करताना १/३ भाग जमिनीत राहील याची काळजी घेऊन पानाच्या लगतची माती चांगली दाबून घ्यावी. साधारणतः कॅक्टस लागवडीसाठी हेक्टरी २००० पानांची गरज भासते. 

बेणे प्रक्रिया

चारा लागवडीसाठी उत्तम जातीची टवटवीत पाच ते सहा महिने जुन्या झालेल्या काटे विरहित परिपक्व पानांची निवड करावी. परिपक्व पाने देठापासून धारदार चाकूने कापून घ्यावी. मातृ वृक्षापासून लागवडीसाठी कापलेली पाने सावलीमध्ये दहा ते पंधरा दिवस सुकवावीत अथवा क्युरिंग करावी. कारण ताज्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते व अशावेळी पानांची लागवड केल्यास सडण्याचे प्रमाण जास्त असते.

लागवडीसाठी काढलेल्या पानांना मातीचा संपर्क येऊ नये म्हणून ताजी कापलेली पाने ताडपत्री किंवा चटईवर सुकविण्यास ठेवावी. पीक लागवडीनंतर कुजव्या रोगापासून संरक्षण व्हावे म्हणून क्युरिंग केलेली पाने बोर्डोपेस्ट (मिश्रण) किंवा मॅन्कोझेब दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात बुडवून घ्यावीत किंवा पाणी फुले ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावेत. 

पाणी व्यवस्थापन

कॅक्टस पिकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते. हे पीक कमी पाण्यात येणारे असल्यामुळे प्रथम लागवडीनंतर दोन ते तीन दिवसातून एकदम कमी प्रमाणात पाणी द्यावे. त्यानंतर एक वर्षापर्यंत दहा ते वीस दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पूर्णपणे स्थापित झालेल्या विकास खूपच कमी प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यासाठी अल्प प्रमाणात पाणी द्यावे त्यामुळे झाडांची चांगली वाढ होऊन उत्पादन चांगले मिळते. 

खत व्यवस्थापन

या पिकास रासायनिक खतांची गरज खूप कमी प्रमाणात लागते. परंतु अन्नद्रव्याच्या कमतरतेचा अभाव झाडाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे पीक लागवडीच्या वेळी ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाश मात्र प्रति हेक्टरी द्यावे. हिवाळ्यामध्ये खतांचा वापर केल्यास नवीन पाने वाढीसाठी चांगली मदत होते. चाऱ्यासाठी पाने कापणी केल्यानंतर दरवेळी २० किलो नत्राची प्रती हेक्टरी मात्रा द्यावी. 

काढणी (कापणी) व्यवस्थापन

चांगल्या पौष्टिक चाऱ्यासाठी पूर्ण वाढ झालेली पानांची कापणी करावी. जेणेकरून त्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी होऊन चाऱ्याच्या पौष्टिकतेचे प्रमाण चांगले मिळते एक वर्षानंतर साधारण प्रत्येक झाडावर आठ ते दहा नवीन पाणी येतात (१२ते १५किलो) तेव्हा त्याची चाऱ्यासाठी कापणी करावी.

निवडुंगाची खालची एक ते दोन पाने तसेच ठेवून बाकीच्या पानांची कापणी करावी. कापलेली पाने गुरांच्या गोठ्यात नेऊन त्याचे धारदार चाकून व कोयतेने बारीक तुकडे करावे तुकडे कोरड्या चाऱ्यासोबत शेळी किंवा मेंढीला पाच ते सहा किंवा गाय आणि म्हैस यांना दहा ते बारा पाने अशा प्रमाणात ते मिसळून वैरण म्हणून द्यावे.

उत्पादन

वरील प्रमाणे नियोजन केल्यास आपणास कॅक्टस चाऱ्याचे ८० ते ९० टन प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. अशाप्रकारे अवर्षण क्षेत्रामध्ये पशुपालन करणारे शेतकरी दुष्काळामध्ये चारा पीक म्हणून त्यांच्या जमिनीमध्ये काटे विरहित निवडुंग लागवड करू शकतात..

प्रा. संजय बडे सहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभागदादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय,दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर.

हेही वाचा : कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणाऱ्या सूर्यफुलाची लागवड ठरेल यंदा फायद्याची; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Spine-free Cactus: A Profitable Fodder Option Rich in Minerals

Web Summary : Spine-free cactus is emerging as a valuable fodder alternative, thriving in harsh conditions. Rich in minerals, calcium, and phosphorus, it requires minimal maintenance and water. Select improved varieties like 1270, 1271, 1280, and 1308 for optimal yield, planting after monsoon. Farmers can yield 80-90 tons per hectare.
टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेती क्षेत्रशेती