Join us

चाऱ्याचा दर दीड पटीने वाढला; दुधाच्या दरात होईल का वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 3:59 PM

मागील महिन्यात गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये होता तो ५० पैशांनी कमी करण्यात आला आहे. आता अनुदानही नाही अन् २६ रुपये ५० पैसे दराने दूध खरेदी होत आहे.

अरुण बारसकरसोलापूर : राज्यातील दूध उत्पादकांचे हाल काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. पशुखाद्याचे दर तर वाढलेले आहेतच शिवाय उन्हाळ्यामुळे हिरव्या चाऱ्याच्या किमतीत दीड पट वाढ झाली आहे, असे असताना खासगी प्रमुख दूध संघांनी गाय दूध खरेदी दर कमी केले आहेत.

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्याची धग थेट पशुधन जोपासणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. हिरव्या चाऱ्याशिवाय जनावरे दूध देत नाहीत.

बऱ्याच शेतकऱ्यांकडे दुभती जनावरे तर आहेत; मात्र पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने हिरवा चारा विकत घ्यावा लागत आहे. जानेवारी महिन्यात १२०० रुपयांना मिळणारी एक सारा मका दर आता १८०० रुपयांपर्यंत गेला आहे.

गेल्या वर्षभरात पशुखाद्याच्या ५० किलोच्या बॅगच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. मका भरड्याचा दरही वाढला आहे. उत्पादन खर्चात वाढ झाली असताना दूध खरेदी दरात मात्र घट झाली आहे. मागील महिन्यात गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये होता तो ५० पैशांनी कमी करण्यात आला आहे. आता अनुदानही नाही अन् २६ रुपये ५० पैसे दराने दूध खरेदी होत आहे.

तिथे ३३ रुपये इथे २६.५० पैसेदेशात गुजरातच्या अमुल सहकारी दूध संघाचा गवगवा आहे. गुजरातच्या अमुलने देशभरात दूध व दूग्धजन्य पदार्थाचे मार्केट काबीज केले आहे. याच अमुलची गाय दूध खरेदी गुजरातमध्ये ३३ रुपये प्रति लिटर तर महाराष्ट्रात अमुल व अमुल अंतर्गत इतर जिल्हा संघ कुठे २७ रुपये ५० पैसे तर कुठे २६ रुपये ५० रुपये दराने दूध खरेदी करीत आहेत.

पशुखाद्य, पेंड, भुसा, भरडा आदींच्या ५० किलोंच्या एका बॅगच्या किमतीत वर्षभरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. आता हिरव्या चाऱ्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने कुठेतरी विकत मिळणाऱ्या वैरणीचे दर दीड पटीने वाढले आहेत. त्यातच दूध खरेदी दरात वाढ होण्याऐवजी घट होत आहे. आता जनावरे सोडता येत नाहीत व सांभाळणेही परवडत नाही. - रवींद्र तुकाराम साठे, दूध उत्पादक शेतकरी

अधिक वाचा:कमी खर्चातील पशुखाद्य अझोला कसा तयार कराल?

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरीराज्य सरकारगुजरातसोलापूर