Join us

उन्हाळ्यातही दुध उत्पादन कमी होणार नाही.. दुभत्या जनावरांची अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:15 AM

वाढत्या तापमानाचा परिणाम पशुधनावर होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुंची या दिवसांमध्ये अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच ऊन तापत आहे. सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, सध्या तापमान ३८ ते ४० अंशांच्या जवळपास पोहोचले आहे. तापमान अधिक वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मात्र, वाढत्या तापमानाचा परिणाम पशुधनावर होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुंची या दिवसांमध्ये अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना चरण्यासाठी सोडू नये, उष्णतेमुळे गरम झालेले पाणी पशुधनास पाजणे टाळावे.

यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. माणसाप्रमाणे पशुधनाच्या आरोग्यावर देखील उष्ण तापमानाचा परिणाम होत असतो. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. असे आवाहन पशुधन विभागाने केले आहे.

कसे कराल व्यवस्थापन - शेती मशागतीची कामे सकाळी किंवा सायंकाळी करावीत.- आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करावा.- थंड हवामानात चारा टाकावा.- वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे.- म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथीच्या कमी संख्येमुळे गायींपेक्षा उष्णतेचा त्रास अधिक होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी.- जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळच्या वेळेत चरण्यासाठी सोडावे.- हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत, जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील.- छपराला पांढरा चुना अथवा रंग लावावा. त्यावर पालापाचोळा टाकावा. यामुळे सूर्याची किरणे परावर्तित होण्यास मदत होईल.- गोठ्याच्या सभोवताली झाडी असावी.- दुपारी गोठ्याभोवती बारदाना, शेटनेट लावावे. जनावरांना मोठ्या प्रमाणात थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पशूची अधिक काळजी घेणे गरजेचे असते.- या दिवसांमध्ये दुग्ध उत्पादनावर परिणाम पडतो. तापमान वाढत असल्याने भूक मंदावते. या दिवसांमध्ये प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.- त्यामुळे शक्यतो जनावरांना दुपारच्या वेळी चरण्यासाठी सोडू नये, अधिक पाणी पाजावे.- कोरड्या चाऱ्यासह हिरवा चारा असेल तर तो देण्यावर अधिक भर द्यावा.

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधपाणीशेतकरी