Join us

महाराष्ट्राचे वैभव - माडग्याळ मेंढीची सार्थ हाक.. मला का देत नाही राष्ट्रीय मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 3:53 PM

सांगली जिल्ह्यातील जत मधील 'माडग्याळ' या छोट्याच्या गावाच्या नावावरून मेंढीला हे नाव पडले आहे. नजीकच्या कवठेमहांकाळ आटपाडी आणि कर्नाटक राज्याच्या नजीकच्या जिल्ह्यात माडग्याळी मेंढ्या मिळून येतात. तथापि वेगाने वजन वाढण्याच्या अनुवंशिकतेमुळे देशातील अनेक पशुपालक, मेंढपाळ याकडे व्यवसायिक दृष्टीने पहात आहेत.

माडग्याळ, ता. जत जिल्हा सांगली येथील पशुपालकांनी विशेषतः मेंढपाळानी पिढ्यानपिढ्या संवर्धन करून, निवड पद्धतीने या माडग्याळ जातीच्या मेंढीचे कळप सांभाळले आणि जगासमोर आणले. नंतर इतर शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून काही बाबी निश्चित केल्या. त्यामध्ये वेगाने वजन वाढण्याची अनुवंशिकता आहे ही बाब एकुणच या मेंढी साठी आणि या व्यवसायाला फार मोठी दिशा देणारी आहे.

सांगली जिल्ह्यातील जत मधील 'माडग्याळ' या छोट्याच्या गावाच्या नावावरून हे नाव पडले आहे. नजीकच्या कवठेमहांकाळ आटपाडी आणि कर्नाटक राज्याच्या नजीकच्या जिल्ह्यात माडग्याळी मेंढ्या मिळून येतात. तथापि वेगाने वजन वाढण्याच्या अनुवंशिकतेमुळे देशातील अनेक पशुपालक, मेंढपाळ याकडे व्यवसायिक दृष्टीने पहात आहेत आणि त्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामध्ये देशातील काही विद्यापीठ देखील संशोधनासाठी खरेदी केल्याचे आढळून आले आहे.

आकाराने मोठी असणारी ही मेंढी-मेंढा मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाची व तपकिरी ठपका असणारी तसेच काही ठिकाणी तपकिरी रंगाची व पांढरे ठपके असणारी किंवा एकत्रित रंगात देखील आढळतात. वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे रोमन नाक व डोळ्याभोवती तपकिरी रंगाचे वर्तुळ! कान पानासारखे लांब व लोंबकळते असतात. काही माडग्याळ मेंढीनां गलोल असते पण ते त्याचे वैशिष्ट्य नाही. दोन्ही नर व मादी मेंढ्यात शिंगे नसतातच. डोके, चेहरा, पोट व पायावर लोकर नसते. शेपूट हे लहान पातळ व आत वळलेले असते. पाय मजबूत व लांब असतात. त्यामुळे मोठा प्रवास ते सहज करू शकतात. खुर हे काळ्या पांढऱ्या रंगाचे किंवा पांढऱ्या तपकिरी रंगाचे असतात. कास गोल व सड हे टोकदार असतात. एकंदरीत या मेंढीचे चरायला सोडूनच संगोपन केले जाते.

साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यांचे राज्यात व नजीकच्या कर्नाटकात चरण्यासाठी स्थलांतर होत असते. परत जून-जुलैमध्ये ते आपल्या मूळ गावी परतत असतात. पूर्णपणे मांस उत्पादनासाठी या प्रजातीचा वापर होतो. वजन वाढीचा वेग विचारात घेऊन एकूणच यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. मांस उत्पादन आणि त्याची निर्यात यातून मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. जगातील अनेक देशांमध्ये मेंढ्यांचं मांस खाल्ले जाते.याच कारणाने राज्य शासनाने माडग्याळ मेंढी संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर संशोधन केंद्र त्याच्या मूळ अधिवास असणाऱ्या माडग्याळ तालुका जत या गावांमध्ये स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जागा देखील उपलब्ध केली आहे. संशोधन संस्थेच्या इमारतीचे आराखडे उपलब्ध होणे बाकी आहे. सदर जागा आयुक्त पशुसंवर्धन यांच्या नावे झाल्यानंतर सदर आराखडे बांधकाम विभागाकडून तयार होतील असे त्या विभागाने कळवले आहे. 

याबाबतीत माडग्याळकरांनी, सर्व ग्रामस्थांनी फार भावनिक न होता सदर संस्था पशुसंवर्धन विभागाच्या जत येथील वळू माता प्रक्षेत्रावर ही संस्था उभी राहण्यासाठी पाठपुरावा करावा व आग्रही रहावे. जेणेकरून पुढे तालुक्यातील, जिल्ह्यातील एकूणच शेळी-मेंढी संशोधनाला मोठा वाव मिळेल. अधिकारी, शास्त्रज्ञांना एक चांगले वातावरण व सर्व सोयी उपलब्ध होतील. मूळ पायाभूत सुविधा वरील खर्च कमी होऊन संशोधन संस्थेसाठीचे नियम व अटींचे पालन होऊन भविष्यात चांगले परिणाम दिसू शकतील, एक सक्षम संस्था उभी राहील. त्यासाठी माडग्याळ येथील ग्रामस्थांसह सांगली व जत येथील लोकप्रतिनिधींनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे.

माडग्याळ मेंढीसाठी आता राष्ट्रीय मान्यता देखील तात्काळ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास मंडळाने पुढाकार घेतला आहे. दि. १० डिसेंबर २०१८ रोजी याबाबतचा प्रस्ताव नॅशनल ब्युरो ऑफ एनिमल जेनेटिक्स रिसोर्सेस करनाल, हरियाणा या संस्थेकडे सादर केला आहे. त्यानंतर वारंवार त्या बाबत पत्रव्यवहार देखील सुरू आहे. तथापि आज अखेर आपल्या या माडग्याळ मेंढी साठी राष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. ती तात्काळ मिळणे आवश्यक आहे.

देशातील आयसीएआर शी संलग्न असणारी ही संस्था देशातील सर्व प्रकारच्या पशुधनाच्या प्रजातीनां राष्ट्रीय मान्यता देत असते. साधारणपणे एखाद्या प्रजातीस राष्ट्रीय मान्यता मिळाली की त्या प्रजातीचा समावेश हा जर पाच वर्षांनी होणाऱ्या पशुगणनेत होतो. संख्या कळते, धोरण आखता येते त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद ही शासकीय पातळीवर संस्था पातळीवर करता येते. त्यातून मग या प्रजातीच्या संवर्धन व संशोधनास चालना मिळते. जागतिक स्तरावर सुद्धा त्याला मान्यता मिळते. लोक त्याबाबत इंटरनेटवर माहिती गोळा करू शकतात. त्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार हा जागतिक स्तरावर होण्यास मदत होते.

एकंदरीत राज्याच्या जैवविविधतेत भर पडून ती गोष्ट अभिमानास्पद ठरते. एकूणच त्यामुळे सर्व माडग्याळ मेंढी संवर्धन करणाऱ्या पशुपालकांना, मेंढपाळानां मोठ्या प्रमाणात फायदा मदत होऊ शकते. त्याच बरोबर पिढ्यानपिढ्या खर्च करून निवड पद्धतीने या मेंढपाळ मंडळींनी जोपासलेल्या या प्रजातीस राष्ट्रीय मान्यता मिळते ही बाब देखील त्यांच्यासाठी अभिमानास्पद ठरते आणि कष्टाचे फळ त्यांना मिळाल्यासारखे होईल.

५ डिसेंबर २३ मध्ये देशातील एकमेव अशा संस्था जी देशातील विविध राज्यांमधील नवनवीन पशुपक्ष्यांच्या प्रजातींना राष्ट्रीय मान्यता देते ती नॅशनल ब्युरो ऑफ ऍनिमल जेनेटिक रिसोर्सेस कर्नाल (NBAGR) यांच्या ब्रीड रजिस्ट्रेशन समितीने (BRC) आपल्या ११ व्या सभेत देशातील आठ नव्या पशु पक्षांना राष्ट्रीय मान्यता दिली. त्यामध्ये महाराष्ट्रातील भीमथडी घोड्यासह अंदमानी-अंजोरी शेळ्या, अंदमानी वराह, अरावली कोंबडी, मचरेला मेंढी व फ्रिजवाल संकरित गाय यांचा समावेश आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातून सादर केलेला 'माडग्याळ' मेंढीचा प्रस्ताव कुठे पेंड खातोय हे कळायला मार्ग नाही. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास मंडळाने दिनांक १० डिसेंबर २०१८ रोजी सादर केलेला प्रस्ताव अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. वारंवार पत्रव्यवहार त्यामध्ये उपस्थित केलेले मुद्दे, शंका याबाबतीत पत्रव्यवहार करून देखील हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. देशातील एकूण ४५ मान्यताप्राप्त मेंढ्यांच्या प्रजाती पैकी महाराष्ट्रातील दख्खनी मेंढी या एकमेव प्रजातीस मान्यता मिळाली आहे. याबाबतीत संबंधितांशी चर्चा केली असता असे कळते की आपल्या माडग्याळ मेंढी सारख्या दिसायला कर्नाटक सीमा भागातील 'माऊली'  या प्रजातीच्या नोंदणीसाठी कर्नाटक शासनाने नामांकन दाखल केले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) व सेंट्रल शीप अँड वुल रिसर्च इन्स्टिट्यूट अविकानगर, राजस्थान (सी एस डब्ल्यू आर आय) यांनी नोंदवलेले आक्षेपांची पूर्तता देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास मंडळाने केल्याचे कळते.

पुढे जाऊन एनबीएजीआर या संस्थेने 'माडग्याळ' आणि 'माऊली' या दोन्ही प्रजाती दिसायला एकच असून त्यांचे सर्व गुणधर्म देखील समान आहेत हे मान्य केले आहे. सोबत माडग्याळ आणि माऊली या दोन्ही नावासह मंजुरी देता येईल व 'माडग्याळ' हे मुख्य नाव ठेवून समानार्थी पर्यायी शब्द म्हणून 'माऊली' अशी मान्यता देऊ म्हणून एकत्रित प्रस्ताव सादर करणे विषयी दोन्ही अर्जदारांना सूचित केले आहे. त्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास मंडळाने मान्य करून एकत्रित अहवाल सादर करण्याबाबत सहमती दर्शवली असल्याचे कळते.

तथापि दोन्ही प्रस्तावातील काही किरकोळ शकांची पूर्तता करण्यासाठी कर्नाटक सरकारने आता पुढे यायला हवे. पण तसे घडताना दिसत नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न अत्यंत आवश्यक आहेत जेणेकरून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळून मोठ्या प्रयत्नाने पिढ्यानपिढ्या निवड पद्धतीने विकसित केलेल्या मेंढपाळांना खरा न्याय मिळेल. राज्याच्या जैवविविधतेत भर पडून ती गोष्ट अभिमानास्पद ठरेल सोबत त्यामुळे सर्व माडग्याळ मेंढी संवर्धन करणाऱ्या पशुपालकांना, मेंढपाळानां मोठ्या प्रमाणात फायदा मदत होऊ शकते. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रित विशेष करून शासन, मंत्री पातळीवर पुढाकार घ्यायला हवा. सोबत इच्छाशक्ती देखील हवी तरच हा प्रलंबित विषय मार्गी लागु शकतो.  

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

टॅग्स :महाराष्ट्रशेतकरीजाटसांगलीशेतीसरकारकेंद्र सरकार