Join us
Daily Top 2Weekly Top 5

गायी-म्हशीतील गर्भपात कशामुळे होतो, त्यावर नेमका उपाय काय करावा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 20:32 IST

cows-buffaloes Abortion : साधारणपणे गाय-म्हैस गाभण काळातील पूर्ण दिवस न घेता विण्यापूर्वीच जर गर्भ बाहेर फेकला तर त्याला जनावर गाभडणे किंवा गर्भपात झाला असे म्हणतात.

cows-buffaloes Abortion : साधारणपणे गाय-म्हैस गाभण काळातील पूर्ण दिवस न घेता विण्यापूर्वीच जर गर्भ बाहेर फेकला तर त्याला जनावर गाभडणे किंवा गर्भपात झाला असे म्हणतात. गर्भाशयाबाहेर फेकलेला गर्भ जिवंत किंवा मृत असू शकतो. गर्भपात होण्याच्या कारणांचा विचार केलातर यामध्ये दोन प्रकार असतात. एक संसर्गजन्य रोगामुळे होणारा आणि दुसरा असंसर्गजन्य गर्भपात. आज आपण असंसर्गजन्य गर्भपाताबद्दल माहिती घेऊयात.... 

गायी-म्हशीच्या गर्भधारणेनंतर अगदी प्रथमावस्थेपासून शेवटच्या महिन्यापर्यंत केव्हाही गर्भपात होऊ शकतो. मुळातच गर्भाशय हे गर्भाची संपूर्ण काळजी घेत असते. त्याचे पोषण, वाढ, संरक्षण आदी सर्व बाबी गर्भाशयामार्फत केल्या जातात. तथापि, गर्भ जर मृत्यू पावला किंवा मृत होण्याच्या मार्गावर असेल तर मात्र गर्भाशय असे गर्भ आपल्या गर्भात न ठेवता बाहेर टाकत असते. 

असंसर्गजन्य गर्भपाताची कारणे अनेक आहेत. अनेकवेळा गाभण जनावरे खरेदी केल्यानंतर खूप दूर अंतरावरून चालवत आणली जातात. वाटेत त्याला योग्य आहार, पाणी आणि विश्रांती मिळाला नाहीतर अशावेळी मोठ्या प्रमाणात थकवा जाणवून गर्भपात होऊ शकतो. अनेकवेळा गायी-म्हशी वाहनातून आणली जातात. अशावेळी क्षमतेपेक्षा जास्त जनावरे वाहनात भरल्यास एकमेकांना मारणे, पोटावर प्रहार करणे, घसरणे, पडणे यामुळेही गर्भपात होतात. 

अनेकवेळा विषारी द्रव्ये, रासायनिक पदार्थ काही औषधामुळेही जनावरांत गर्भपात होतो. अशी विषारी द्रव्ये पाण्यातून जनावरांच्या पोटामध्ये जाऊ शकतात. कीटकनाशके, शेतात-बागेत फवारले जाणारे औषधही गर्भपातास कारणीभूत ठरते. विषारी वनस्पती धोतरा, बेशरम यासह ज्वारीचे पीक घेतल्यानंतर येणारे फुटवे खाण्यात आलेतरीही गर्भपात होतो. 

सडलेले धान्य, बुरशीयुक्त कडबा व मुरघास यानेही गर्भपात होतो. गाभण जनावरांचे दूध बंद झाल्यानंतर अनेक पशुपालक सकस व संतुलित आहार देत नाहीत. त्यामुळे योग्य पोषणतत्त्वे न मिळाल्याने गाभण जनावर अशक्त होतात व गाभडतात.

अ जीवनसत्त्व, फॉस्फरस व आयोडीन हे महत्त्वाचे अन्नघटक मिळाले नाहीत तरीही गर्भपात होतो. अनेकवेळा गाभण जनावरे प्राथमिक अवस्थेत माजाची लक्षणे दाखवतात. अशावेळी कृत्रिम रेतन करताना हे लक्षात न आल्याने गर्भपात होऊ शकतो. यासाठी प्रत्येकवेळी माजाची लक्षणे कशी असतात त्यांचे निरीक्षण करूनच खात्री करावी. मगच कृत्रिम रेतनासाठी दवाखान्यात गाय-म्हैस घेऊन जावे. 

अनेकवेळा गाय-म्हैस गाभण गेल्यानंतर महिन्याभरातच प्राथमिक अवस्थेत गर्भ आतल्या आत शोषला जातो किंवा जिरतो. अशावेळी गाय-म्हैस दीड ते दोन महिन्यांनी पुन्हा माजावर येते. यावेळी आपण जनावर उलटले असे समजतो; पण सदर गर्भ हा मरण पावून त्याचे गर्भाशयात शोषण होते. त्याला Early Embryonic Death असे म्हणतात. 

या सर्व कारणांसाठी गाभण काळात वाहतूक करताना, पशुखाद्य व वैरण घालताना काळजी घ्यावी. तसेच बाहेर चरायला सोडत असल्यास चौकस राहून कोणत्याही परिस्थितीत विषारी द्रव्य असणारे पाणी किंवा बुरशीयुक्त वैरण खाण्यात येणार नाही व विषारी युक्त वनस्पती खाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे आपण आपल्या जनावरांचा गर्भपात टाळू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Cows and Buffaloes Abortion: Causes, Prevention, and Detailed Solutions

Web Summary : Non-infectious abortions in cows and buffaloes can be caused by transportation stress, toxins, poor nutrition, and accidental breeding during early pregnancy signs. Prevention involves careful handling during pregnancy, ensuring quality feed, and avoiding poisonous substances.
टॅग्स :शेती क्षेत्रदुग्धव्यवसायदूधगायशेती