- संजय सोनार
जळगाव : खान्देशातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग उघडत सेवा सहयोग फाउंडेशन ग्रामोदयतर्फे तीन वर्षे शेळीपालन व कुक्कुटपालन उपजीविका प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहेत. या उपक्रमांचा लाभ आजवर ३०० हून अधिक विधवा, भूमिहीन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंत पोहोचला आहे.
याचेच पुढचे पाऊल म्हणून आता शेळीबँक सुरू करण्याच्या अनुषंगाने पहिली पायरी पूर्ण केली आहे. गिरणा परिसर महिला पशुपालकांनी एक कंपनी स्थापन केली असून कंपनीमार्फत शेळ्यांचे लसीकरण, विमा व आरोग्य सेवा प्रशिक्षण करण्यात येत आहे. यावर्षी संस्थेने महिला सक्षमीकरणाला नवीन दिशा देत 'शेळी बँक' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
काय आहे शेळी बँक ?
संस्थेकडून शेळ्या मिळालेल्या महिलांनी त्यांच्या शेळ्यांपासून जन्मलेले एक पिलू संस्थेला परत करायचे आहे. हे पिल्लू 'शेळी बँक' मध्ये जमा करून इतर गरजू महिलांना मोफत दिले जाते. कोणत्याही अतिरिक्त निधीशिवाय प्रकल्प शाश्वत राहतो. परस्पर सहकार्याची आणि एकोप्याची भावना बळकट होते.
या शेळी बँक संकल्पनेमुळे भविष्यात नवीन महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाते आणि तेही नवीन भांडवल न उभारता. ज्यांनी संस्थेच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू केला, त्या महिलांनीच एक पिल्लू द्यायचे असल्याने संस्थेला नवीन गरजूंना शेळी देण्यासाठी खर्च उभारावा लागत नाही. त्यामुळे शेळी बँक हा अभिनव उपक्रम नवीन लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
बँकेसाठी महिलांचे प्रेरणादायी योगदान
'शेळी बँक'च्या पहिल्या टप्प्यात ६ लाभार्थी महिलांनी स्वेच्छेने १ पिल्लू संस्थेकडे जमा केले आहे. न थकता प्रयत्न करणाऱ्या महिला या उपक्रमाला यशस्वी करण्यामध्ये संस्थेचे सर्व हितचिंतक, दाते, कार्यकर्ते, तसेच सहभागी झालेल्या सर्व महिलांचे योगदान आहे. महिलांच्या सातत्यपूर्ण सहकार्यातून 'शेळी बँक' हा उपक्रम खान्देशातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा शाश्वत मार्ग बनला आहे.
