Agriculture News : जनावरांना जंताचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पचनसंस्थेतील आम्ल स्रवण करणाऱ्या ग्रंथीस इजा होते. आम्लाचे संभाव्य प्रमाण घटल्यामुळे प्रथिनांचे पचन होत नाही. शरीराची वाढ व वजन घटते. जंत अन्नद्रव्यांचे शोषण करत असल्यामुळे शरीराची वाढ घटतेच; परंतु अन्नद्रव्याबरोबर जंत हे खनिजांचे देखील शोषण करतात.
या घटकांची पुनरुत्पादन तसेच कालवड माजावर येण्यासाठी अतिशय आवश्यकता असते. जंताच्या प्रादुर्भावामुळे पुनरुत्पादनावर परिणाम होतो. वासराचा वयोगट ते कालवड माजावर येईपर्यंत आणि त्यानंतर प्रसूतिपूर्व व पश्चात जंतनाशकाची मात्रा दिल्यास गाई, म्हशीचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.
पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळ्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व स्थानिक ठिकाणानुसार वेळापत्रक तयार करावे. जनावरांना जंतनाशकाची मात्रा त्या वेळापत्रकानुसार योग्य प्रमाणात नियमितपणे द्यावी. कुरणावर करावयाचे व्यवस्थापन आणि कुरणावर फिरत्या पद्धतीने जनावरास चारावे.
सकाळी दवबिंदू आहेत तोपर्यंत जनावरांना चरावयास सोडू नये. वनस्पतिजन्य जंतनाशके उपलब्ध झाल्यास आलटून-पालटून पद्धतीने रासायनिक जंतनाशकासोबत त्यांचाही वापर करावा. कुरणातील गवतावर जंताची संख्या जास्त असल्यास ते गवत कापून वाळल्यानंतर जनावरांना खाण्यासाठी द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी