- राजेश मडावीचंद्रपूर : पारंपरिक शेतीतून निराशा वाट्याला येताच जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनातून दुग्धोत्पादनाची (Milk Production) कास धरली. विविध जिल्ह्यांतील व राज्याबाहेरीलही नव्या प्रजातींचे संगोपन करण्याचे धाडस दाखविले. यातून आता राजस्थानातील ‘थारपारकर’ आणि गुजरातची ‘गीर’ ही देखणी गायचंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) सुखेनैव नांदत असल्याचे चित्र जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने चांदा क्लब ग्राउंडवरील पशुप्रदर्शनीतून दिसून आले. निवडक शेतकऱ्यांचा हा बदललेला कल इतरांनाही संजीवनी देणारा ठरू शकताे.
जिल्हाधिकारी विनय गौडा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात पशुप्रदर्शनी घेण्यात आली. सोमवारी प्रदर्शनीला भेट दिली असता गाय, म्हैस व शेळी प्रवर्गातील अगदी नव्या प्रजातींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. जिल्हा व राज्याबाहेरील नवीन प्रजातींची दुधाळी जनावरे (Livestock) चंद्रपूर जिल्ह्यातील वातावरणात रुजतील की नाही, याबाबत शंका वाटत होती.
मात्र, प्रत्येक टप्प्यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरूळकर, विभागाचे अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे नवीन प्रजातींच्या दुधाळ जनावरांचे संगोपन करणे शक्य झाले. गुजरातच्या गीर गायीचे चंद्रपूर तालुक्यात, तर राजस्थानातील ‘थारपारकर’ ही गाय चंद्रपूरनजीक वढोली येथील शेतकरी देखील संगोपन करतात. त्यासाठी १३ प्रकारची चारा पिके व बियाणे खेमजई येथे उपलब्ध होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सुमारे २० ते ३० लिटर दूध देते जाफराबादी म्हैस...प्रदर्शनीतील गाय प्रवर्गात ११, म्हैस ४, शेळी ५ व बदक व कोंबडी प्रवर्गातील विविध प्रजातींची प्रदर्शनी भरविण्यात आली. यामध्ये डांगी (इगतपुरी), देवणी (लातूर), खिल्लार (सोलापूर), लाल कंधारी (नांदेड), गवळाऊ (वर्धा), थारपारकर (राजस्थान), गीर (गुजरात), कठाणी (चंद्रपूर), संकरित एच.एफ. (चंद्रपूर), संकरित जर्सी (चंद्रपूर), नागपुरी म्हैस (नागपूर), पंढरपुरी (सोलापूर), मुऱ्हा (चंद्रपूर), जाफराबादी म्हैस (गुजरात), उस्मानाबादी शेळी (वरोरा), बीटल (चंद्रपूर), बारबेरी शेळी (सोलापूर), काठीयावाडी शेळी (कच्छ), बेरारी, आफ्रिकन बोअर (वरोरा), डेक्कनी मेंढी (चंद्रपूर), खाकी कॅम्पबेल बदक (वडसा) इत्यादींचा समावेश होता.
महाराष्ट्र सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून जाहीर केले. याच संकल्पनेवर यंदा पशुप्रदर्शनी भरविण्यात आली. उत्तम पशुसंवर्धन व दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचीही माहिती देणे सुरू आहे.- डॉ. उमेश हिरूळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, चंद्रपूर
शेतकरी म्हणतात...मी गवळाऊ गायींचे संगोपन करतो. माझ्या गाईंसोबत या प्रदर्शनीत सहभागी झालो. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना गवळाऊ गायींची उपयोगिता समजावून सांगितली.- भोजराज अरबट, खरांगणा-मोरांगणा, जि. वर्धा
मी जर्सी गायींचे पालन करीत आहे. या गायी भरपूर देतात. दूध उत्पादनावरच कुटुंबाचा प्रपंच चालतो. शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाकडे वळल्यास आर्थिक अडचणी दूर करता येतात.- नामदेव येकरे, नंदोरी, ता. भद्रावती जि. चंद्रपूर
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून राहू नये. दुग्ध व शेळीपालनाचाही व्यवसाय करावा. यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनातून चांगल्या प्रजातींची निवड करावी.- ताराचंद खाणेकर, शेळीपालक, रामपूर, ता. वरोरा जि. चंद्रपूर