Join us

Lumpy Skin Disease : लम्पीचा विळखा : बदनापूरात ११ जनावरांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:23 IST

Lumpy Skin Disease : बदनापूर तालुक्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे.आतापर्यंत १७ जनावरांना या रोगाचा विळखा बसला असून ११ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पण सरकारी दवाखान्यात डॉक्टरांची कमतरता, फिरता दवाखाना बंद आणि अपूर्ण इमारत यामुळे शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.(Lumpy Skin Disease)

संतोष सारडा 

बदनापूर तालुक्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांत एकूण १७ जनावरांना लम्पीचा विळखा बसला असून यापैकी ६ जनावरे उपचारानंतर पूर्णपणे बरी झाली आहेत. मात्र उर्वरित ११ जनावरांवर उपचार सुरू आहेत. (Lumpy Skin Disease)

शेतकऱ्यांची धाव खासगी डॉक्टरांकडे

तालुक्यात बावणे पांगरी, वाकुळणी आणि शेलगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारी यंत्रणेकडून वेळेवर उपचार मिळत नसल्याने शेतकरी खासगी डॉक्टरांकडे धाव घेत आहेत.

दवाखान्याच्या इमारतीचे काम रखडले

बदनापूर येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी शासनाकडून तब्बल ३ कोटी १४ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे इमारतीचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. सध्या हा दवाखाना जिल्हा परिषदेच्या शाळेतील छोट्याशा खोलीत सुरू आहे.

फिरता दवाखाना बंदच

शासनाने जनावरांना बांधावरच उपचार मिळावेत म्हणून फिरता पशुवैद्यकीय दवाखाना उपलब्ध करून दिला होता. पण वाहनाच्या कमतरतेमुळे हा दवाखाना बंद अवस्थेत आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत.

तालुक्यातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असून सर्व दवाखान्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लम्पीची लक्षणे दिसताच शेतकऱ्यांनी तातडीने सरकारी दवाखान्यात यावे. खासगी डॉक्टरांकडे जाणे टाळावे. - डॉ. दुर्गेश गोल्हेर, सहायक आयुक्त, पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, बदनापूर

बदनापूर येथील नवीन दवाखान्याच्या इमारतीसाठी जागा कमी पडत असल्याने नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा वाढीव कालावधी मागण्यात आला आहे. – विजय राठोड, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

हे ही वाचा सविस्तर : Lumpy Skin Disease : लसीकरण पूर्ण… तरीही लंपीचा धोका? नेमकं काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :कृषी योजनाप्राणीप्राण्यांवरील अत्याचारजालनाशेती क्षेत्रशेतकरीशेती