नाशिक : जिल्ह्यातील २५० पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ३० टक्के पदे रिक्त असल्याने जनावरांवर उपचार मिळेनासे झाले आहे. या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा, अपुरे उपकरणे आणि औषधसाठ्याचा अभाव यामुळे अनेक प्राणी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आजारी पडतात.
कळवण व सटाणा तालुक्यांतील पशुवैद्यकीय दवाखान्यांत सर्वाधिक पदे रिक्त असून, त्या खालोखाल मालेगाव तालुक्यातील रिक्त पदांचा समावेश आहे. पदे लवकरात लवकर भरली जावी, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे.
अनेक दवाखान्यांमध्ये फक्त कुत्रे व मांजरांवरच उपचार असल्याचे वास्तव समोर आले असून, शेतकरी आपली आजारी जनावरे खासगी दवाखान्यात नेत आहेत. नुकत्याच झालेल्या पशुगणनेत जिल्ह्यात दहा लाख पशुधन आढळून आले आहेत.
एका रुग्णालयावर किती गावे अवलंबून?एका रुग्णालयावर साधारण पाच ते सहा गावे अवलंबून आहेत. १० टक्के रुग्णालयांवर १० गावे अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गुरांच्या उपचारासाठी सुविधा वेळेवर पुरविणे गरजेचे आहे.
प्रत्येक गावात पर्यवेक्षक निर्णय धाब्यावरगुरांवर वेळेत उपचार व्हावे, यासाठी साधारण एक किंवा दोन गावे मिळून एक पर्यवेक्षक द्यावा, यासाठीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय कागदावरच आहे. त्यामुळे त्या-त्या ठिकाणी गुरे मालकांची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून देखील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा आहे.
राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तीन हजार जागा भरण्यासाठी शासन निर्णय घेतला होता. जिल्ह्यातील २० टक्के पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये संगणक तसेच गुरांवर उपचार करण्यासाठीच्या नवीन तंत्रज्ञानातील कीटचा अभाव आहे. तसेच सर्वत्र धूळ असून, सुरक्षारक्षक नसल्याने मोकाट गुरांचा वावर असतो. तसेच टवाळखोरांकडून नासधूस केली जाते.
जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ३० टक्के रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. सर्वच दवाखान्यांत औषधी उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी आपले पशुधन नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी न्यावीत.- प्रशांत धर्माधिकारी, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग
Web Summary : Nashik faces a veterinary doctor shortage despite livestock growth. Thirty percent of positions are vacant, hindering animal care. Rural areas demand swift appointments to address the crisis impacting timely treatment and reliance on private clinics.
Web Summary : नासिक में पशुधन वृद्धि के बावजूद पशु चिकित्सकों की कमी है। तीस प्रतिशत पद खाली हैं, जिससे पशुओं की देखभाल बाधित हो रही है। ग्रामीण क्षेत्रों में समय पर इलाज और निजी क्लीनिकों पर निर्भरता को संबोधित करने के लिए तत्काल नियुक्तियों की मांग की जा रही है।