Join us

Dairy Management : पशुपालकांनो! गाभण गायीच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 15:01 IST

Dairy Management : पशुपालकांसाठी पशुधनाचे (Dairy Farming) आरोग्य सांभाळणे अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी असते.

Dairy Management : पशुपालकांसाठी पशुधनाचे (Dairy Farming) आरोग्य सांभाळणे अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी असते. आरोग्य चांगले राहिल्याने पशुधन रोगाला बळी पडत नाही. शिवाय दूध उत्पादन देखील चांगले मिळते. त्यात गाभण गायीचे संगोपन काळजीपूर्वक करावे लागते. यात लसीकरणापासून (vaccination) चाऱ्यापर्यंत आवश्यक गोष्टी पुरवणे गरजेचे असते. या लेखाद्वारे गाभण गायीचे आरोग्य आणि दुभत्या गाई, म्हशींची उत्पादनक्षमता वाढविणे, याबाबत जाणून घेऊयात... 

गाभण गाईचे आरोग्य

गाभण काळात गाईची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. तसेच व्यायल्यानंतर चिकाद्वारे वासराला रोगप्रतिकारक शक्ती देण्यासाठी गाईच्या शरीरात विविध रोगांविरुद्ध अँटिबॉडीज तयार होणे आवश्यक असते. अनेक पशुपालक गाभण काळात गाईंचे लसीकरण करून घेत नाहीत. परंतु गाभण काळातसुद्धा लस उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरण करावे. जेणेकरून गाईच्या शरीरात विविध रोगांविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन, ती कालवडीला चिकाद्वारे मिळू शकेल.

काही प्रकारचे जंत गर्भाशयातच कालवडीला प्रादुर्भाव करतात. गाभण काळात सातव्या महिन्यात गाईला जंत निर्मूलन करून घ्यावे, जेणेकरून त्यांच्या प्रदुर्भावास अटकाव होईल. यासाठी गाभण काळात सुरक्षित असणारी व सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी औषधांचा वापर वजनानुसार आणि पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करावा. गोचीड, उवा, पिसवा इत्यादी बाह्यपरोपजीवींचे नियंत्रण करावे.

दुभत्या गाई, म्हशींची उत्पादनक्षमता वाढविणे

देशी गाय किंवा मिश्र पैदास केलेल्या गाई तसेच म्हशींपैकी कुठल्याही जाती आपण दूध उत्पादनासाठी निवडल्या तरीही त्यांची दूध उत्पादनक्षमता तपासून पाहावी. चांगल्या गुणवत्तेची दुधाळ जनावरे आपल्या गोठ्यात आणली तर पुढील पैदास चांगली होईल. सध्याच्या काळात सेक्स सीमेन किंवा सॉर्टेड सीमेन, एम्ब्रियो ट्रान्स्फर तंत्रज्ञान दूध उत्पादकांपर्यंत पोहोचत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे उत्तम उत्पादनक्षमता असलेल्या प्रजाती तयार करून योग्य पैदास धोरण, उत्तम पशू आहार, राहण्याची उत्तम व्यवस्था व आरोग्य काळजी यामुळे जनावरांची पूर्ण उत्पादनक्षमता वापरता येईल.

- ग्रामीण मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

टॅग्स :दुग्धव्यवसायशेती क्षेत्रगायशेती