नितीन कांबळे
कधीकाळी शेतीचे मुख्य आधारस्तंभ असलेले बैलजोडी आता विरळ होत चालले आहेत. मागील काही वर्षातील आकडेवारी धक्कादायक असून, बैलांची संख्या निम्म्यावर आली आहे. यामुळे पोळ्यासारखे सणही फिकट होताना दिसत आहेत.(Bailjodi)
एकेकाळी ग्रामीण महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात सर्जा-राजा म्हणजेच बैलजोडी हमखास असायची. नांगरणी, वखरणी, पाळी, पेरणी, कोळपणी ते वाहतूक अशा प्रत्येक शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर केला जायचा. पण अत्याधुनिक शेतीत ट्रॅक्टरच्या आगमनानंतर शेतकऱ्यांच्या दारासमोरील बैलजोडी आता इतिहासजमा होत चालली आहे.(Bailjodi)
तेरा वर्षांत २३ हजारांनी घट
आष्टी तालुक्यात तेरा वर्षांपूर्वी बैलांची संख्या तब्बल ४० हजारांच्या घरात होती. मात्र आज ही संख्या २३ हजारांनी घटून फक्त १७ हजारांवर आली आहे. पूर्वी जिथे प्रत्येक घरासमोर बैलजोडी अभिमानाने उभी असायची, तिथे आता मिनी ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा नवा सोबती ठरला आहे.
बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली
आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टरमुळे वेळ व श्रम वाचू लागले. नांगरणी, पेरणी, फवारणी यांसारखी कामे जलदगतीने पार पाडली जाऊ लागली. परिणामी बैलांचे महत्त्व कमी झाले. त्यातच शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्याने दुभत्या जनावरांचे पालन वाढले, पण बैलजोड्या मात्र कमी होत गेल्या.
बैलपोळ्यात केवळ १०० जोड्या
पूर्वी बैलपोळ्याच्या सणाला गावोगावी शेकडो बैलजोड्यांच्या मिरवणुका निघायच्या. रांगांच्या रांगा गावभर दिसायच्या. परंतु आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे.
आज बहुतेक गावांत १०० च्या आसपासच बैलजोड्या दिसतात. सणाचा पारंपरिक उत्साह आता फिकट होत चालला आहे.
नामशेष होण्याच्या मार्गावर बैलजोडी
शेतकरी दुग्ध व्यवसायावर भर देत असल्याने बैलांचा सांभाळ करणे खर्चिक व अवघड ठरत आहे. परिणामी केवळ काही ठराविक शेतकरीच अजूनही बैलजोडी घरात ठेवतात.
ग्रामीण भागातील ज्या परंपरा बैलांभोवती फिरायच्या, त्या हळूहळू लुप्त होत आहेत. भविष्यात बैलजोडी नामशेष होण्याचा धोका असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.