Join us

Bail Bajar : आता जनावरांची ऑनलाईन खरेदी-विक्री, तुमच्याकडे रुमाल पद्धत वापरतात का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:50 IST

Bail Bajar : आठवडे बाजार म्हटला तर पंचक्रोशीतील आलेले पशुधन त्यासाठी व्यवहार जुळवून देणारे गुरांचे व्यापारी शिवाय व्यवहार पूर्णच होत नव्हता. 

जळगाव : गुरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात (Online Bail Bajar) बाजारातील लोकांसमक्ष हातावर रुमाल टाकून बोटांच्या सांकेतिक हालचालीवर खरेदी-विक्रीचा व्यवहार करून देणारे दलाल वजा व्यापारी याचा गुरांचा व्यवसाय कात टाकत आहे. सोशल मीडियाच्या वापराने आता पशुधन सेकंदात खरेदीदार शेतकऱ्यांच्या मोबाईलवर (bail bajar) झळकतात आणि बसल्या जागेवरून व्यवहार पार पडतो. हा डिजिटल गुरांचा व्यापार शेतकऱ्यांच्या आवडीचा विषय बनला आहे.

शेतकऱ्यांना पशुधन खरेदी-विक्री (Pashudhan Kharedi Vikri) करायची असेल तर परिसरात भरणाऱ्या गुरांच्या आठवडे बाजाराची प्रतीक्षा करावी लागत होती. अधिकच्या संख्येने पशुधन पाहायचे असेल तर लांबचा प्रवास करून गुरांच्या यात्रेचा पर्याय शोधावा लागायचा. गुरांचा आठवडे बाजार म्हटला तर पंचक्रोशीतील आलेले पशुधन त्यासाठी व्यवहार जुळवून देणारे गुरांचे व्यापारी शिवाय व्यवहार पूर्णच होत नव्हता. 

शेकडो लोकांसमक्ष व्यवहार घडवून देण्यासाठी पारसी भाषा व हातावर रूमाल टाकून होणारा व्यवहार प्रचलित आहे. हा प्रकार सामान्यांना समजण्यापलीकडचा असतो. शहरी भागात वेगवेगळ्या पाळीव प्राणी व पक्ष्यांची पैदास किंबहुना सोशल मीडिया अॅप आदी माध्यमातून विक्री प्रचलित आहे; परंतु शेती उपयोगी व दुधाळ पशुधनाची ऑनलाईन विक्रीबाबतचे मोबाईल अॅप प्रचलित नाही.

अशी होते गुरांची ऑनलाईन खरेदी-विक्रीहरयाणामध्ये दुधाळ म्हशींची ऑनलाईन खरेदी-विक्री अलीकडे वापरात आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्यापारी राज्यात पशुधनाचे फोटो परस्परांना पाठवून बसल्या जागेवरून पशुधन खरेदी-विक्री करून देत आहेत. व्यापारी थेट विक्रीस असलेल्या पशुधन मालकाकडे जाऊन बैल व म्हशीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाच्या वापराने खरेदीदार शेतकऱ्यांस पाठवितात. पसंती पडल्यास जागेवरूनच व्यवहार पूर्ण होतो. संबंधित बाजाराची व्यवहार पावती करून विक्री झालेले पशुधन थेट खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दारावर पोहोचविले जातात.

बाजारात गुरांची संख्या घटलीदरम्यान, या डिजिटल व्यवहारामुळे गुरांच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या पशुधनाची संख्या ३० टक्क्यांनी रोडावली आहे; पशुधन विक्रीसाठी नेणे आणणे हा खर्च टाळण्यासाठी आता शेतकरी व्यापारी लोकांना घरीच बोलावतात. खुट्यावरील पशुधन दाखवून डिजिटल व्यवहारालाच पसंती देत आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनादुग्धव्यवसाय