Goat Farming Guide : नैसर्गिक पध्दतीने बोकड सोडून शेळ्या भरविणे हे नेहमीच शक्य होत नाही. एकाच वेळी बऱ्याच शेळ्या माजावर (Goat Farming) आल्यास किंवा जवळ योग्य तो बोकड उपलब्ध नसल्यास कृत्रिम पध्दतीने शेळ्या भरविणे आवश्यक ठरते. कृत्रिम रेतन पध्दतीने बोकडाच्या एक वेळच्या विर्यापासून एका वेळेस ८ - १० शेळ्या एकाच दिवशी भरविणे शक्य असते.
जास्त उत्पादनक्षम बोकड आपल्याकडे कमी असल्यामुळे, कुठल्याही गावठी बोकडाकडून शेळ्या भरविल्या जातात. त्यामुळे त्यापासून झालेल्या नव्या शेळ्या कमी दुध व कमी मांस देणाऱ्या होतात. या उलट जास्त दुध व जास्त मांस निर्माण करणाऱ्या जातिवंत कुळातील बोकड वापरल्यास फायदा वाढू शकतो.
कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणेचे फायदे :
- उत्कृष्ट नराच्या विर्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो.
- संकलित विर्याची व्यवस्थित तपासणी करता येते.
- चांगला बोकड म्हातारा झाल्यावरही त्याच्या पूर्वी गोठून ठेवलेल्या विर्यापासून शेळी भरविता येते.
- ग्रामीण गरीब शेतकऱ्यास उत्कृष्ट पण महाग बोकड पोसावा लागत नाही. थोडी फी देऊन चांगल्या बोकडाच्या विर्याचा फायदा घेता येतो.
- उत्पादनक्षम करडे निर्माण करता येतात.
- या पध्दतीत शेळी व बोकड यांच्या प्रत्यक्ष जननेंद्रियांचा संबंध येत नसल्याने एकमेकांचे पुनरुत्पादन संस्थेचे रोग एकमेकांना लागत नाहीत.
- एका हंगामात एका बोकडाच्या विर्यापासून अनेक शेळ्या भरविता येतात.
- बोकडाच्या एका वेळच्या विर्यापासून १० शेळ्या सहज भरविता येतात.
- मौल्यवान विदेशी बोकडाचे विर्य हवे असल्यास कृत्रिम रेतन हीच योग्य पध्दत आहे.
- शेळ्या भरविण्यांचा हंगाम संपल्यावर बोकडाच्या विर्याची प्रत ढासळते.
- अशावेळी चांगले पण पूर्वी घेऊन गोठवून ठेवलेले विर्य वापरता येते.
कृत्रिम रेतन क्रिया :
शेळीच्या योनीत स्पेक्युलम (स्टेनलेस स्टीलची विशिष्ट चिमटा) घालून तिच्या गर्भाशयाचे मुख गुलाबी व लेष्मायुक्त आहे का हे पाहिले जाते. वीर्य आत सोडण्यास विशिष्ट काचनळ्या मिळतात. त्यामधून अर्धा ते एक मिली पातळ विर्य गर्भाशयाच्या तोंडावर सोडतात. नळी काढून घेऊन शेळीस मोकळे सोडतात.
कृत्रिम रेतन पध्दती यशस्वी करण्याकरिता महत्वाच्या बाबी :
- शेळी पालकास या पध्दतीची माहिती असावी.
- सर्व गावठी बोकड खच्ची करावे.
- माजावर असलेली शेळी वेळेवर कृत्रिम रेतन केंद्रावर न्यावी.
- कृत्रिम रेतन पध्दतीने एकदा भरविलेली शेळी गाभण न राहिल्यास परत २१ दिवसांनी माजावर आल्यानंतर भरवावी.
- कृत्रिम रेतन करणारा व्यक्ति प्रशिक्षित असावा.
- एका बोकडाचे विर्य एकदाच काढावे.
एककालीन प्रजनन / एकाचवेळी शेळ्या-मेंढ्या माजावर आणण्याचे तंत्र (Heat Synchronization) पद्धती :
- बोकड सोडून एकाच वेळी माजावर आणण्याची पध्दत
- औषधाचा वापर करुन माजावर आणण्याची पध्दत
- प्रोस्टाग्लॅन्डिन इंजेक्शनः ११ दिवसाच्या अंतराने २ इंजेक्शने
- स्पंज किंवा सी.आय.डी.आर पध्दत
- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, नाशिक