Join us
Daily Top 2Weekly Top 5

७५ लाखांची बुटकी म्हैस; ५० लाखांचा ‘सोन्या’ बैल : परळीत पशुधनाचा जल्लोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 11:22 IST

परळीतील ओपले मैदानावर सध्या पशुसंपदेचा भव्य सोहळा रंगला आहे. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग तर्फे आयोजित 'महा पशुधन एक्सपो २०२६'मध्ये ७५ लाखांची बुटकी म्हैस, ५० लाखांचा 'सोन्या' बैल आणि तब्बल ४५ लिटर दूध देणारी जर्सी गाय नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

संजय खाकरे

परळीतील ओपले मैदानावर सध्या पशुसंपदेचा अक्षरशः महाकुंभ भरला आहे. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग तर्फे आयोजित 'महा पशुधन एक्सपो २०२६' मुळे राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील दुर्मीळ, उच्च क्षमतेचे आणि मौल्यवान पशुधन एकाच छताखाली पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जनसागर उसळला होता.

या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार धनंजय मुंडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

दोन फूट आठ इंच उंच 'राधा' म्हैस : किंमत ७५ लाख!

प्रदर्शनातील सर्वांत मोठे आकर्षण ठरली ती साताऱ्याच्या माण तालुक्यातील अनिकेत बोराटे यांनी आणलेली 'राधा' ही बुटकी म्हैस. अवघी दोन फूट आठ इंच उंची असलेल्या या म्हशीची किंमत तब्बल ७५ लाख रुपये आहे. तिच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र असल्याचे आयोजकांनी सांगितले. ठेंगणी उंची आणि गोंडस रूपामुळे आबालवृद्ध तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते.

५० लाखांचा 'सोन्या' बैल : मालकावर जीव

बारामतीचा प्रसिद्ध हिंदकेसरी 'सोन्या' बैल प्रदर्शनाची शान ठरला. तब्बल ५० लाख रुपये किंमत असलेल्या या बैलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे मालकाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते. पशुपालक संतोष कोकणे यांनी प्रेमाने “ए सोन्या, पप्पी घे!” अशी हाक दिली असता सोन्याने मालकाच्या गालावर मुका घेतला. हा भावुक क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. सांगोल्याच्या आबा बंडगर यांचा बैलही कमांडवर ‘पप्पी’ घेताना पाहायला मिळाला.

४५ लिटर दूध देणारी जर्सी गाय

दुग्ध व्यवसायातील प्रगतीचे दर्शन घडवणारी तब्बल ४५ लिटर दूध देण्याची क्षमता असलेली जर्सी गाय प्रदर्शनात दाखल झाली आहे. तिच्यासह ३५ हून अधिक उच्च दर्जाच्या गायी शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दररोज १५ लिटर दूध देणारी म्हैस, तसेच लाल कंधारी आणि देवणी या देशी जातींच्या गायींनी प्रदर्शनाची शोभा वाढवली. सुधारित पैदास, पोषक आहार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दूध उत्पादनात कशी वाढ साधता येते, याची माहिती येथे दिली जात आहे.

‘फातेह’ घोडा आणि नेदरलँडचा ‘सानेन’ बकरा

पंजाबहून आलेला रत्नाकर वंशाचा ‘फातेह’ घोडा आपल्या राजेशाही देहयष्टीमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचबरोबर पुण्याहून आणलेला नेदरलँडच्या नेदरलँड मधील ‘सानेन’ जातीचा पांढराशुभ्र बकरा, ज्याची किंमत सुमारे आठ लाख रुपये, पाहण्यासाठी शेळीपालकांनी मोठी रांग लावली होती.

याशिवाय काश्मिरी फायटर बकरा आणि रिंगमधून उड्या मारणारे प्रशिक्षित श्वान तरुणाईसाठी आकर्षण ठरत आहेत.

शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचा मेळा

हा एक्सपो केवळ प्रदर्शनापुरता मर्यादित नसून शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचा मेळा ठरत आहे. आधुनिक पशुखाद्य, कृत्रिम रेतन, सुधारित पैदास पद्धती, आरोग्य व्यवस्थापन आणि दुग्ध व्यवसायातील तांत्रिक प्रगती याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

पशुसंपदेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था कशी बळकट करता येईल, याचे जिवंत उदाहरण या प्रदर्शनातून पाहायला मिळत आहे.

परळीत भरलेल्या या ‘महा पशुधन एक्सपो २०२६’ने पशुपालक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने पशुधनाचा शाही थाट अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Melghat Coffee Story : महाराष्ट्रात १५० वर्षांची कॉफी परंपरा; मेळघाटात दरवळतो 'अरेबिका'चा सुगंध

English
हिंदी सारांश
Web Title : Parli Animal Expo: 75 Lakhs Dwarf Buffalo, 50 Lakhs Bull!

Web Summary : Parli's 'Maha Pashudhan Expo 2026' showcases rare livestock. A 75-lakh dwarf buffalo, 'Radha,' and a 50-lakh bull, 'Sonya,' are major attractions. The expo features high-yielding cows, breeds, and modern animal husbandry techniques.
टॅग्स :शेती क्षेत्रप्राणीगायशेतकरीशेती