Join us
Daily Top 2Weekly Top 5

July 2024 Milk Subsidy : जुलैच्या पहिल्या दहा दिवसांचे गाय दुधाचे अनुदान झाले जमा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 11:42 IST

राज्य शासनाकडून गाय दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दूध अनुदानाचे (Maharashtra Milk Subsidy) पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 'गोकुळ', 'हॅप्पी' व जोतिर्लिंग दूध संघाच्या ४३ हजार दूध उत्पादकांच्या खात्यावर तब्बल ३ कोटी ८ लाख २५ हजार रुपये जमा झाले आहेत.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : राज्य शासनाकडून गाय दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दूध अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 'गोकुळ', 'हॅप्पी' व जोतिर्लिंग दूध संघाच्या ४३ हजार दूध उत्पादकांच्या खात्यावर तब्बल ३ कोटी ८ लाख २५ हजार रुपये जमा झाले आहेत.

जुलै महिन्यातील पहिल्या दहा दिवसांचे हे अनुदान असून उर्वरित कालावधीतील सात कोटी अनुदानाच्या प्रस्तावांची तपासणी सुरू आहे.

गाय दुधाचे दर कमी झाल्याने शासनाने ११ जानेवारीपासून प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची घोषणा केली. ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील बहुतांश दूध उत्पादकांना अनुदानाचे पैसे मिळाले आहेत.

गाय दुधाच्या दरात वाढ होत नसल्याने शासनाने जुलै ते सप्टेंबर महिन्यासाठी प्रतिलिटर अनुदान कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, मात्र तीन महिन्यांचा कालावधी संपत आला तरी दूध उत्पादकांना पैसे मिळाले नसल्याने अस्वस्थता होती.

अखेर, 'गोकुळ', 'हॅप्पी', 'जोतिर्लिंग' दूध संघाच्या ४३ हजार ३९६ दूध उत्पादकांच्या ३ कोटी ८ लाख २५ हजार ५०० रुपये अनुदानास मंजुरी देण्यात आली आहे.

या संघांचे पैसे आलेत...

संघउत्पादकअनुदान
गोकुळ४०,६७८२ कोटी ६२ लाख २७ हजार ३२५
हॅप्पी१,७०७७ लाख ७८ हजार ८१९
जोतिर्लिंग७२७५ लाख १३ हजार ७६०

१ ऑक्टोबरपासून ७ रुपये अनुदान

शासनाने गाय दूध उत्पादकांसाठी अनुदानाचा कालावधी वाढवत असताना अनुदान रकमेतही वाढ केली आहे. सप्टेंबरपर्यंत प्रतिलिटर ५ रुपये अनुदान होते. त्यात वाढ करून ७ रुपये करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार आहे.

यांनी भरली माहिती

गोकुळ', वारणा, स्वाभिमानी', 'विमल डेअरी', डिलिशिया', 'शाहू मिल्का, भारत डेअरी', 'जोतिर्लिंग डेअरी', 'हॅप्पी'.

जुलै महिन्यातील अनुदान येण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित प्रस्तावांची तपासणी सुरू असून लवकरच ते जमा होईल. - प्रदीप मालगावे (सहायक निबंधक दुग्ध).

आमच्याशी व्हॉटअप्पद्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा. 

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायशेतकरीशेतीशेती क्षेत्रसरकारी योजना