Join us

कमी खर्चात हायड्रोपोनिक्स पध्दतीने हिरवा चारा निर्मिती व्यवसाय कसा सुरु कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 3:59 PM

हायड्रोपोनिक्स hydroponics चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करणे. याचा व्यवसायही चांगल्याप्रकारे करता येईल.

हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करणे. या तंत्रज्ञानाचा वापर करून उन्हाळ्यात किंवा टंचाईकाळात चांगल्या प्रतिचा हिरवा चाऱ्याचे उत्पादन घेता येते. दुग्ध व्यवसायात चारा घटक खूप महत्वाचा आहे आणि यात टंचाईच्या काळात शेतकरी पशुपालक हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा निर्मिती करू शकतात.

हायड्रोपोनीक पध्दतीने चारा उत्पादनासाठी आवश्यक बाबी

१) शेडनेट/पॉलीहाऊसहायड्रोपोनीक तंत्राद्वारे चार निर्मितीसाठी निवाऱ्याची जागा आवश्यक आहे. यासाठी प्रामुख्याने शेडनेटचा वापर करावा. ५० टक्के शेडनेटचा वापर केल्यास त्यातून पीक वाढीसाठी आवश्यक सुर्यप्रकाशही पिकास उपलब्ध होईल, पॉलीाऊसचाही वापर यासाठी करता येईल किंवा पाचटाचे शेड असल्यास त्याचाही वापर करता येईल. फक्त यामध्ये प्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध असावा. साधारणतः एक गुठा आकाराच्या शेडनेटमध्ये १५ ते २० गायांचा चारा उत्पादन घेता येते. शेडची अंची ८ ते १० फुट ठेवावी. शेडनेट सर्व बाजुंनी बंदिस्त ठेवून जाण्या-येण्यासाठी दरवाजा ठेवावा. शेडनेटमध्ये खाली जाड बाळू पसरावी यामूळे शेडनेटमध्ये पाणी फवारणीमुळे चिखल होणार नाही.

२) ट्रे ठेवण्यासाठी मांडण्याशेडनेटमध्ये हायड्रोपोनीक चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी मांडण्या तयार कराव्या लागतात. मांडण्या या तात्पुरत्या स्वरूपात बांबूच्या करता येतात किंवा कायम स्वरूनी मांडण्या करण्याची जी. आय. पाईप, अँगलचाही वापर करता येतो. यावर प्लॅस्टीक ट्रे ठेवून तयामध्ये उत्पादन घेतले जाते. रॅकची रूंदी प्लॅस्टीक ट्रेच्या आकारमानानुसार ठेवावी. साधारणतः मांडणीची रूंदी ३ फुट ठेवावी. मांडणीमध्ये प्लॅस्टीक ट्रे ठेवण्यासाठी ४ स्टेप्स (पायऱ्या) कराव्यात. दोन स्टेपमधील अंतर २ फुट ठेवावे. तसेच जमिनीपासून पहिल्या स्टेपमध्ये १ ते १.५ फुट अंतर ठेवावे. दोन मांडण्यामध्ये ४ ते ४.५ फुट अंतर ठेवावे म्हणजे पाहणी करणे, ट्रे आत बाहेर घेणे सोईस्कर होईल.

चारा उत्पादनासाठी पाण्याची गरज असते. यासाठी शेडनेट बाहेर गरजेनुसार २०० ते ५०० लीटरची टाकी बसवुन टाकीतून पाईपद्वारे शेडनेटमध्ये पाणी आणावे. मांडणीच्या प्रत्येक स्टेपमध्ये ठिबकाचा लॅटरल जोडून त्या लॅटरल पी व्ही पी पाईपास जोडाव्यात. लॅटरलवर प्रत्येक २.५ फुट अंतरावर जेट किंवा फॉगर्स बसवावेत. जेट/फॉगर्सच्या सहाय्याने ट्रे वर पाणी फवारणी केली जाते यासाठी इलेक्ट्रीक मोटर जोडावी तसेच स्वयंचलीत टायमर लावाल्यास ठराविक वेळेस आपोआप पाणी चालू आणि बंद होते. त्यामुळे पाणी फवारणीचे कष्ट कमी होतात. सदर सुविधा नसल्यास पाठीवरील पंपाने सुध्दा ठराविक वेळेस प्लॅस्टीक ट्रेमधील चारा पिकावर पाणी फवारता येते.

३) प्लॅस्टीक ट्रेहायड्रोपोनीक पध्दतीने चारा उत्पादन ही प्लॅस्टीक ट्रे मध्ये केली जाते. यासाठी विविध आकाराचे ट्रे वापरतात. प्लॅस्टीक ट्रेचे साधारणतः आकारमान ३ x २ फुट किंवा २ x १.२५ फुट असते. उंची १० ते १२ सेमी असावी. प्लॅस्टीक ट्रे खालील बाजूस बंदिस्त असल्यास जास्त झालेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठराविक अंतरावर छिद्रे पाडावीत. प्लॅस्टीक ट्रे खालील बाजूस जाळीदार असल्यास त्यामध्ये छिद्रे पाडलेला प्लॅस्टीक कागद पसरसून त्यावर उत्पादन घ्यावे. मांडणीमध्ये ट्रे ठेवतांना त्याला थोडासा उतार असावा जेणेकरून जास्तीचे पाणी निचरा होईल. मुळांना बुरशी न लागता तसेच कुजण्याची क्रिया कमी होवून चाचणांचे प्रमाण कमी होईल.

४) बियाणेहायड्रोपोनीक पध्दतीने चारा उत्पादन घेण्यासाठी प्रामुख्याने सरळ वाढणारी पीके निवडावेत. मका. ओट या पिकांचे भारतात प्रामुख्याने चारा उत्पादनासाठी वापर करतात. यापैकी ओटचे उत्पादन हे फक्त हिवाळयातच करता येते. तसेच मक्याच्या तुलनेत ओटचे उत्पादन कमी येते. याउलअ मक्याचे उत्पादन वर्षभर घेता येते. यामुळे प्रामुख्याने मका पिकाची निवड हायड्रोपोनीक चारा निर्मितीसाठी करावी. मक्याचे बियाणे निवडतांना स्वच्छ, न फुटलेले बियाणे लागवडीसाठी वापरावे. फुटलेले बियाणे असल्यास निवडून काढावे अन्यथा यावर इतर बुरशीची वाढ होवून चारा उत्पादन खराब होवू शकते. या शिवाय बियाणे भिजविण्यासाठी भांडे, बियाण्यास मोड आणण्यासाठी ज्यूटचे पोते तसेच प्लॅस्टीक ट्रे निर्जतूंक करण्यासाठी क्लोरीन पावडर इ. बाबी आवश्यक असतात.

चारा उत्पादन तंत्रज्ञानचारा उत्पादनासाठी मका हे सर्वात योग्य पीक आहे. प्रथम मकाचे बियाणे घ्यावे. त्यातील इतर कडीकचरा, फुटलेले बियाणे काढून टाकावे. बियाणाची उगवण क्षमता चांगली असावी. ८५ टक्के पेक्षा कमी उगवणक्षमता नसावी. निवडलेले बियाणे मोजून भांड्यात पाणी घेवून त्यात भिजत ठेवावे. पाण्यावर तरंगणारे बियाणे कढून टाकावे. साधारणतः १२ तास बियाणे पाण्यात ठेवावे. १२ तासानंतर बियाणे पाण्यातून काढून आले पोते किंवा गोणीमध्ये गुंडाळून मोड येण्यासाठी अंधा-या ठिकाणी ठेवावे. दोन ते तीन दिवसात बियाण्यात मोड येतात. या दरम्यान गोणीची ओल कमी झाल्यास त्यावर हलके पाणी शिंपडावे म्हणजे योग्य आर्द्रता राहून मोड लवकर येतील. मोड आलेले बियाणे शेडनेटमध्ये चारा उत्पादनासाठी वापरावे.

मोड आलेले बियाणे वाढीसाठी प्लॅस्टीक ट्रे मध्ये पसरून ठेवावे. यासाठी प्रथम प्लॅस्टीक ट्रे क्लोरीनच्या पाण्याने पुसुण निर्जतुक करून घ्यावेत. प्लॅस्टीक ट्रे खालील बाजूस जाळीदार असल्यास त्यात ठराविक अंतरावर छिद्रे पाडलेला प्लॅस्टीक कागद पसरावा. प्लॅस्टीक कागदसुध्दा क्लोरीनच्या पाण्योन निर्जतूक करावा. ट्रे मध्ये मोड आलेले बियाणे पसरावे, बियाणे पसरवताना एकसारखे पसरावे. अधिक बियाणे कमी जागेत पसरू नये अन्यथा बियाणे एकावर एक पसरले जातात. यामुळे उमवण व वाढ व्यवस्थीत होत नाही. यासाठी साधारणतः ३५० ग्रॅम मका बियाणे प्रति चौ. फूट या प्रमाणत वापरल्यास त्याचे प्रमाण कमी किंवा अधिक होता एकसारखे पसरले जाते. बियाणे पसरविल्यानंतर ट्रे मांडणीवर ठेवावेत. बियाण्याची उमवण व्यवस्थित मोड आल्यानंतर ट्रे मध्ये टाकावेत. तसेच मोड आलेले बियाणे जास्त हाताळू नयेत. शेडनेटमधील तापमान १५ ते २५ अंश सेंग्रे. दरम्यान आणि आर्द्रता ५० ते ८० टक्के ठेवावी म्हणजे बियाण्याची उगवण चांगली होते.

पाणी व्यवस्थापनबियाणे प्लॅस्टीक ट्रे मध्ये ठेवल्यानंतर दररोज ठराविक अंतराने त्यास पाणी फवारणे गरजेचे आहे. पाणी फवारतांना जेट किंवा फॉगर्सच्या सहाय्याने फवारावे किंवा फवारणी पंप, हातपंपाच्या सहाय्याने ट्रेमधील बियाण्यावर पाणी फवारावे. पाणी फवारणीचा कालावधी आणि प्रमाण योग्य असावे. पाण्याचे प्रमाण अधिक झाल्यास पीक सडण्याची शक्यता असते तसेच पाणी कमी झाल्यास पीकाची वाढ खुंटते तसेच पीक जळू शकते. पाणी फवारणीची वेळ ही प्रामुख्याने हावामानावर अवलंबून असते. पावसाळा, हिवाळयात दर दोन तासांनी २ मिनीटे पाणी फवारावे तर उन्हाळयात दर तासाने २ मिनीटे पाणी फवारावे.

पाणी फवारल्यास पीकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. पाण्याची फवारणी फक्त दिवसा करावी. पाण्यामूळे पीक वाढीसाठी आवश्यक असणारा ओलावा व आर्द्रता ठेवता येते. ट्रे शेडमध्ये ठेवल्यानंतर साधाणतः १० ते १२ दिवसांत पिकांची उंची २५ ते ३० सेमी होते तसेच ट्रे मध्ये मुळांची घट्ट गादी ८ ते १० सेमी जाडीची तयार होते. पीकाची वाढ झाल्यानंतरही अधिक दिवस शेडनेटमध्ये ठेवलयास त्यात पाणी साचून ते कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. तसेच त्याची वाढही मंदावते. त्यामूळे २५ ते ३० सेमी उंची झाल्यानंतर चाऱ्यासाठी वापरावे. मका पिकाची साधारणः १२ दिवसात वाढ पुर्ण होते.

वापरचाऱ्याची वाढ पुर्ण झाल्यानंतर ट्रे मधील चाऱ्याची मॅट काढून बारीक तुकडे करून जनावरास खाऊ घालावेत. चारा हा लुसलुसीत, कोवळा असल्याने मुळांसह चारा जनावरे आवडीने खातात. एका गाईला दररोज १२ ते १५ किलो हिरवा चारा खाऊ घालावा. हा चारा इतर हिरव्या किंवा वाळलेल्या चा-यासोबत एकत्र करूनही खाऊ घालता येतो. चारा शेडनेटच्या बाहेरही आल्यानंतर ४८ तासाच्या आत जनावरास खाऊ घालावा. चारा काढलयानंतर प्लॅस्टीक ट्रे धुवुन निर्जतुक करून पुन्हा चारा उत्पादनासाठी वापरावा.

उत्पादनमक्याचे हायड्रोपोनीक तंत्रज्ञानाद्वारे उत्पादन हे सरासरी २.२५ कि प्रति चौ फुट १० ते १२ दिवसात मिळते. म्हणजेच (२ x ३) फुट आकाराच्या ट्रेमध्ये १२ ते १४ किलो हिरवा चारा उत्पादन मिळते. एका गाईला एका ट्रे मधील चारा दररोज दिल्यास १२ ट्रे एका गाईसाठी लागतात. ट्रे रिकामा झाल्यानंतर पुन्हा त्यात बियाणे वाढीसाठी टाकावे म्हणजे ट्रे चे रोटेशन व्यवस्थित राहून वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होईल. एका गाईला १० ते १२ ट्रे (२ x ३ फुट आकाराचे) या प्रमाणे गायांच्या संख्येनुसार दररोज ट्रे भरल्याचे नियोजन करावे.

एका गुंठा क्षेत्रामध्ये २० गायांच्या चाऱ्याचे व्यवस्थापन- शेडचा आकार ५० फुट x २० फुट (१००० चौ. फुट)- शेडमध्ये ५० फुट (लांबी) x ३ फुट (रूंदी) x ८ फुट (उंची) आकाराचे तीन बांतूच्या मांडण्या ठेवाव्यात.- एका मांडणीमध्ये चार पायऱ्या असाव्यात- प्लॅस्टीक ट्रेचे आकारमान ३ x २ फुट- मांडणीच्या एका पयरीवरील ट्रे ची संख्या सरासरी - २०- एका मांडणीवरील ट्रे संख्या -८०- एकूण तीन मांडण्यावरील ट्रे संख्या- २४०- एका गाईसाठी दररोज एक ट्रे मधील चारा (१२ ते १४ किलो)- २० गायीसाठी दररोज २० ट्रे- १२ दिवसांसाठी एकूण २४० ट्रेअशाप्रकारे ट्रे चे रोटेशन ठेवून वर्षभर एक गुंठा क्षेत्रातून २० गायांसाठी हायड्रोपोनीक पध्दतीने हिरवा चारा उत्पादन घेता येईल.

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीपीकदूधगाय