Join us

जनावरांतील घटसर्प रोगाची ओळख आणि लसीकरण कसे करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 11:13 AM

मोठ्या जनावरांना घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकूत व शेळ्या मेंढ्यांना पीपीआर या रोगाविरुद्ध लसीकरण सुरू झाले आहे. जवळजवळ हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे कळते.

सध्या उन्हाळा, मान्सून पूर्व कालावधी त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची लसीकरणासाठी लगबग सुरू आहे. मोठ्या जनावरांना घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकूत व शेळ्या मेंढ्यांना पीपीआर या रोगाविरुद्ध लसीकरण सुरू झाले आहे. जवळजवळ हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे कळते.

या सर्व साथीच्या रोगाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपचार म्हणून लसीकरण हा एकमेव उपाय आहे यात शंका नाही. त्यासाठी विभागाच्या आयव्हिबीपी या संस्थेने २३-२४ मध्ये ६१ लाख घटसर्प लसींचे उत्पादन करून राज्यात वितरित केले आहे.

घटसर्प या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा आपल्या जिल्ह्यात अधून मधून होत असतो. विशेषतः नदीकाठचा भाग या रोगासाठी खूप अनुकूल असतो. त्यामुळे नदी काठची जी गावे आहेत, तेथील पशुपालकांसह इतर भागांतीलदेखील पशुपालकांनी या घटसर्प रोगाविरुद्ध लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात हमखास हा रोग आढळून येतो. पावसाळ्यात प्रत्येकाच्या गोठ्यात ओलसरपणा वाढतो. सगळीकडे दलदल, अस्वच्छता वाढते. अनेक वेळा वैरण भिजलेली असते. सकस आहाराच्या अभावामुळेदेखील जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. 

या रोगाचा प्रादुर्भाव हा विशेषतः म्हशी, संकरित गाईंसह शेळ्या, मेंढ्या, घोडे, उंट, गाढव व डुकरांमध्ये आढळून येतो. या रोगास लहान वासरे लवकर बळी पडतात. अनेक वेळा कोणतेही लक्षण पशुपालकांच्या निदर्शनास येण्यापूर्वीच लहान वासरे मरताना दिसतात.

रोगाची लक्षणे- या रोगांमध्ये अतितीव्र व सौम्य प्रकारची लक्षणे दिसतात.- १०६ ते १०७ डिग्री फॅरेनाइट इतका ताप येतो.- अनेक वेळा हगवण लागते.- सर्वात महत्त्वाचे म्हणजे गळ्याला सूज येते व श्वास घेण्यास त्रास होऊन घशातून एक एकरात घरघर असा आवाज येतो.- डोळे लाल होऊन भूक कमी होते.- दूध उत्पादन घटते.- नाक वाहायला लागते.- अनेक वेळा तोंडाने श्वास घेण्यास जनावर सुरू करते.

वेळेत व तत्काळ उपचार झाल्यास जनावर वाचू शकते. तथापि, अति उशीर झाल्यास २४ ते ४८ तासांत जनावर दगावते. त्यासाठी लसीकरण हे फार महत्त्वाचे आहे. सध्या वाढलेले तापमान विचारात घेऊन सकाळी व संध्याकाळी लसीकरण करून घ्यावे. पण, दूध कमी येते, गाठी होतात म्हणून लसीकरण टाळू नये. इतकी काळजी घेतली तर, आपण पशुधन घटसर्प या रोगापासून वाचवू शकतो.

डॉ. व्यंकटराव घोरपडे सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

अधिक वाचा: जनावरांत रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून काय कराल?

टॅग्स :दुग्धव्यवसायगायशेतकरीशेतीतापमान