Join us

Gadhav Bajar Jejuri : जेजुरीमधील प्रसिद्ध गाढव बाजारात दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:31 IST

पौष पौर्णिमा Khandoba Yatra Jejuri खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त गडकोटाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात गाढवांचा बाजार भरला आहे.

जेजुरी: पौष पौर्णिमा खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त गडकोटाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात गाढवांचा बाजार भरला आहे.

बाजारात गुजरात (काठेवाड), राजस्थान व महाराष्ट्र (गावठी), आदी १५०० हून अधिक विविध प्रकारच्या जातींची गाढवे दाखल झाली आहेत.

बाजारात खरेदी-विक्रीतून दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली आहे. श्री खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत पौष पोर्णिमेनिमित्त पुरातन काळापासून गाढवांचा बाजार भरतो.

यामध्ये माती वडार, गाडी वडार, मदारी, गारुडी, माकडवाले, कैकाडी, परीट, बेलदार, वडार, कुंभार, आदी समाजबांधव राज्याच्या विविध प्रांतांतून दाखल होत गाढवे खरेदी करतात.

दातांवरून गाढवाचे वय ठरवले जाते. चार दात असलेल्या पशूला 'चौवान,' तर दोन दात असलेल्यास 'दुवान' म्हटले जाते. अक्कर म्हणजे ज्याला दात आलेले नाहीत असे छोटे पशू, यांना त्या मानाने किंमत कमी मिळते.

काठेवाड (गुजरात) पशूची किंमत ५० ते ७० हजार रुपये; तर महाराष्ट्रीय गावठी पशूची किंमत २० ते ३५ हजार रुपये मिळत आहे. याबाबत कंधार (जि. नांदेड) येथून गाढवे खरेदीसाठी आलेले किसन गोविंद तेलंगे यांनी सांगितले.

यंदा पशुंच्या किमती आवाक्याबाहेर असून, नर कमी आणि मादी पशू विक्रीसाठी आलेल्या आहेत. काठेवाडी गाढवाची किंमत जास्त असल्याचे कोल्हार (जि. अहिल्यानगर) येथून आलेल्या दत्तू जाधव यांनी सांगितले.

पौष पौर्णिमा उत्सव व येथील बाजाराला मोठी परंपरा आहे. कायमस्वरूपी जागा राखीव ठेवावी व आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सोमवारी (दि. १३) नामदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले आहे. - रामा यल्लप्पा काळे, येडशी, जि. धाराशिव

टॅग्स :जेजुरीपुणेबाजारनांदेडखंडोबा यात्रामहाराष्ट्रगुजरात