Join us

Fodder: पशुपालकांचा पर्यायी चाऱ्यावर भर, पशुधनाच्या दावणीत घटतोय हिरवा चारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:07 IST

पशुपालकांचा पर्यायी चाऱ्यावर भर, पशुधनाच्या दावणीत घटतोय हिरवा चारा

उन्हाची वाढती तीव्रता, नद्या, नाले, ओढे, प्रकल्प कोरडेठाक पडल्याने पाणीपातळीत झालेली घट पशुधनाच्या मुळावर आली आहे. जिल्ह्यात अनेक गावांत टँकरच्या पाण्यावर नागरिकांची तहान भागविली जात आहे. तिथे पशुधनाच्या चारा, पाण्याची सोय करण्यात पशुपालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच शहरी भागात तर, हिरव्या चाऱ्याच्या पेंडीचा दर एप्रिल महिन्यात ५० वर गेला आहे. त्यामुळे पशुधन सांभाळण्यासाठी पशुपालकांना कसरत करावी लागत आहे.

उन्हें वाढत असल्याने ग्रामीण भागांत पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे तर, शहरी भागांत हिरवा चारा महागल्याने पशुपालकांना कसरत करावी लागत आहे. लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिंगरोडलगत असलेल्या बाजारात दररोज हिरवा चारा विक्रीस येतो. यंदा हिरव्या चाऱ्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. बहुतांश चारा हा मक्याचा येत असून त्याची एक पेंडी ५० ते ६० रुपयांना विक्री होत आहे तर ठोक विक्री शेकडा ३ ते ४ हजार रुपयांप्रमाणे मिळत आहे. पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन घटले आहे. त्यातच ऊसतोडणीत आता वाडे शिल्लक राहत नसल्याने ज्वारीच्या कडबा, सोयाबीन, तुरीचा भुसा हा पशुधनासाठी चारा म्हणून वापरला जात आहे.

इथे मिळतो पशुधनाचा चारा...

लातूर शहरातील शाहू चौक, बार्शी रोडवर जुने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर, पाच नंबर चौक, बाजार समितीच्या आवारात हिरवा चारा विकला जातो. सध्या ५० ते ६० रुपयांना एक पेंडी विकली जात असल्याचे पाच नंबर चौकातील एका विक्रेत्याने सांगितले. उन्हामुळे दोन महिने चारा महाग होत असल्याचे त्यांनी सांगितले.

* दुधाळ जनावरांना हिरवा चारा देणे गरजेचे आहे. अनेक पशुपालक दूधवाढीसाठी हिरव्या चाऱ्यासोबत खुराकही देतात. एप्रिल महिन्यात हिरव्या चाऱ्याची पेंडी ५० ते ६० रुपयांना मिळत असल्याने पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. एका दुधाळ पशुला दिवसभरात किमान ५ ते ६ पेंडी चारा लागतो. त्यासोबतच इतर खुराकही द्यावा लागतो. दिवसभराचा खर्च ५०० रुपयांच्या घरात जात असल्याचे पशुपालक शिवाजी पवार यांनी सांगितले.

एप्रिल, मे महिन्यात चाऱ्याचा प्रश्न...

दरवर्षी एप्रिल, मे, जून महिन्यात हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. उन्हामुळे शेतशिवारही ओस पडतात. पाणीटंचाईमुळे चाऱ्याचे उत्पादनही घटते. लातूर शहरालगत असलेल्या गावातून लातूरमध्ये हिरवा चारा विक्रीसाठी आणला जातो. दोन महिने चांगला दर मिळत असला तरी चारा जोपासण्यासाठी येणारा खर्चही जास्त असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.

टॅग्स :दुग्धव्यवसायचारा घोटाळाशेतकरी