Join us

शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय; हौसेखातर ४५ लाखांची ही वस्तू आणली दारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 12:51 IST

करंजे येथील शेतकरी व गलाई व्यावसायिक शरद माने यांनी बेळंकीतील प्रसिद्ध अशा हिंदकेसरी सुंदऱ्या या बैलाला तब्बल ४५ लाखाला खरेदी केले आहे.

खानापूर : करंजे येथील शेतकरी व गलाई व्यावसायिक शरद माने यांनी बेळंकीतील प्रसिद्ध अशा हिंदकेसरी सुंदऱ्या या बैलाला तब्बल ४५ लाखाला खरेदी केले आहे.

या सुंदऱ्या बैलाने बैलगाडा शर्यतीत अवघ्या महाराष्ट्रात आपल्या नावाचा दबदबा केला आहे. पळशी, हिवरे, खानापूर येथील बैलांनी महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.

त्यामुळे बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खिलार जातीच्या बैलांच्या संगोपनात व खरेदीत वाढ होऊ लागली आहे.

डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांनी देशिंग येथे आयोजित केलेल्या रुस्तम-ए- हिंद बैलगाडा शर्यतीत हिंदकेसरी सुंदऱ्याने प्रथम क्रमांक पटकावून राज्यातील बैलगाडा शर्यत शौकिनांचे लक्ष वेधून घेतले होते.

मला व माझ्या मुलाला बैलगाडी शर्यतीचा नाद आहे, खिलार जातीचा उत्तम असा बैल आपल्याकडे असावा, अशी आमची इच्छा होती म्हणून हा नामवंत असा हिंदकेसरी सुंदऱ्या आम्ही खरेदी केला आहे. - शरद माने, करंजे

टॅग्स :शेतकरीशेतीखानापूरसांगली