Join us

दुधाचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका; जनावरांच्या बाजारात विक्रीचे भाव मंदावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 16:25 IST

Animals Market Update : दुधाचे भाव कमी झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात दुभत्या संकरित गायींचा भाव कवडीमोल झाला आहे. दुभत्या म्हशींचे भाव मात्र तेजीत आहेत.

बाळासाहेब काकडे

दुधाचे भाव कमी झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात दुभत्या संकरित गायींचा भाव कवडीमोल झाला आहे. दुभत्या म्हशींचे भाव मात्र तेजीत आहेत.

शेतकऱ्यांकडून छोट्या ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने लाखाची बैलजोडी साठ हजारांत मिळू लागली आहे. दर बाजारात पाच ते साडेपाच हजार जनावरांची खरेदी-विक्री होत आहे.

यातून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला साडेतीन ते चार लाखांचा महसूल मिळत आहे. त्यामुळे काष्टीचा जनावरांचा बाजार हा बाजार समितीचा मुख्य उत्पादन स्रोत बनला आहे. लवकरच येथे कांदा मार्केट सुरू होणार आहे.

काष्टी येथील जनावरांच्या आठवडे बाजाराला १०० वर्षांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहाराची परंपरा आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील व्यापारी जनावरांची खरेदी-विक्री करण्यासाठी येतात. त्यामुळे जातिवंत बैलजोड्या, संकरित गायी, म्हशी मिळतात.

प्रत्येक आठवड्याच्या बाजारातून चार ते पाच कोटींची उलाढाल होते. जनावरे परराज्यातून आणायची, त्यांची खरेदी किंमत आणि विक्रीची किंमत यांचा सध्या ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारीही अडचणीत आले आहेत.

पाच ते सहा महिन्यांच्या गाफण म्हशीला ७० हजार रुपये ते १ लाख ४० हजारांचा भाव मिळतो. संकरित दुभती गाय २० ते ७० हजारांना मिळते. खिलार बैलजोडीस ३० हजार ते १ लाख ३० हजार रुपये मिळतात.

व्यापारी काय म्हणतात...

संदीप राहिज, माऊली पाचपुते, मच्छिंद्र काळे, शहाजी भोसले या व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता यांत्रिक युगात बैलजोडी विक्रीच्या व्यवसायावर बलट आहे. पशुखाद्याचे भाव वाढले आणि दुधाचे भाव तीन रुपयांनी कमी झाले. त्यामुळे गायीचा धंद्यात तर लाखाचे बारा हजार होऊ लागले आहेत.

काष्टीचा आठवडे बाजार हा श्रीगोंदा बाजार समितीचा प्राणवायू आहे. काष्टीत कांदा मार्केट सुरू करण्यासाठी ६० लाखांचा निधी मिळाला आहे. हे काम सुरू होईल. तसेच शेतकरी निवास बांधून व्यापाऱ्यांना निवारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. - अतुल लोखंडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा.

शकेश्वरी बैलजोडीची धूम...

काष्टीच्या बाजारात कर्नाटक राज्यातील शकेश्वर येथील खिलार बैलजोडीची घूम दिसत आहे. हरियाणाची म्हैस आणि पंजाबच्या गायींना चांगला भाव मिळत आहे.

जनावरांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून सेस पोटी ३ ते ४ लाखांचे उत्पन्न दर आठवडे बाजारात मिळते. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याकडे बाजार समितीचे विशेष लक्ष आहे. कांदा मार्केट सुरु झाले की बाजाराला आणखी बळ मिळणार आहे. - राजेंद्र लगड, सचिव, बाजार समिती, श्रीगोंदा.

हेही वाचा :  Dairy Farmer Success Story : शेतीला पशुधनाची जोड गरजेची; दूध दर कमी असतांनाही देविदासरावांची आर्थिक प्रगती

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधबाजारअहिल्यानगरशेतकरीशेतीशेती क्षेत्र