Join us

जनावरांच्यातील विषबाधा टाळायची असेल तर हे करू नका

By बिभिषण बागल | Updated: May 21, 2024 17:11 IST

जनावरांच्यात विषबाधा कशामुळे होते. ती होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला हव्यात.

कुरणात चरावयास जाणाऱ्या जनावरांमध्ये विषबाधेचे प्रकार जास्त प्रमाणात आढळतात. कारण ही जनावरे खाद्य वनस्पतींसोबत काही अखाद्य, विषारी पदार्थ देखील खातात. पर्यायाने त्यांना विषबाधा संभवते. हे लक्षात घेऊन पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावेत.

निसर्गात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती वा ज्याप्रमाणे औषधी म्हणून उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे असंख्य वनस्पती या विषारी देखील आहेत. उदा. घाणेरी, धोतरा, गाजरगवत इत्यादी. या वनस्पतींप्रमाणेच विविध खनिजद्रव्ये उदा. फ्लोरिन, शिसे, तांबे इ. जर जनावरांच्या खाण्यात आले, तर त्यापासून जनावरांना विषबाधा संभवते.

बऱ्याच वेळा अपघाताने होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण हे जास्त आहे. कीटकनाशके फवारणी केलेले पीक जनावराच्या खाद्यात आल्यास विषबाधा होते. कीटकनाशके अथवा घातक रसायने तयार करणाऱ्या कारखान्याच्या सांडपाण्यातून जनावरांना विषबाधा संभवते.

उपाययोजना- कीटकनाशके फवारलेल्या शेतात जनावरे जाऊ देऊ नयेत.- जनावरांचे खाद्य व कीटकनाशके एकाच खोलीत साठवून ठेवू नयेत.- जनावरांच्या अंगावरील परजीवी उदा. गोचीड, उवा, माश्या यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करतात.- अशा वेळी जनावराच्या शरीरावर एखादी जखम असल्यास कीटकनाशकाचा वापर करू नये.- गोचीड, उवा मारण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करत असताना कीटकनाशकांच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावे, याकरिता पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन उपचार करावा.- जर एखाद्या गाय किंवा म्हशीस विषबाधा झाली, तर अशा जनावराचे दूध तिच्या पिल्लास अथवा आपल्या खाण्यात येऊ देऊ नये. अशा दुधापासून देखील बाधा संभवते.- विषारी वनस्पतींची ओळख पशुपालकास असावी, यामुळे अशा वनस्पती जनावरांच्या खाद्यात येणार नाहीत, याची काळजी घेता येते.- जनावरांना कुरणात चरावयास नेत असताना त्या ठिकाणचे पिण्याचे पाणी, ओढा-नाला यात कारखान्याचे सांडपाणी सोडले असल्यास असे दूषित पाणी जनावरे पिणार नाहीत, याची काळजी घ्यावी.- रंगकामाकरिता वापरात येणारे तैलरंग, वॉर्निश यांचा संपर्क जनावरांच्या खाद्याशी येऊ नये. या रंगांत शिसे या धातूचा वापर केलेला असतो. पर्यायाने यापासून विषबाधा संभवते.- जनावरांच्या गोठ्यात पशुपालकाने नियमित जावे, यामुळे जनावरांच्या वागणुकीतील झालेला बदल व त्यांचे इतर आजार अथवा विषबाधेच्या लक्षणांशी असलेला संबंध लगेच लक्षात येईल.- विषबाधा झालेल्या जनावरास तत्काळ पशुवैद्यकाद्वारे उपचार करावेत.- विषबाधेचा संशय आल्यास विषबाधा निर्माण करणाऱ्या कारणाचा विचार करून ते तत्काळ दूर करावे. उदा. खाद्यातून/पाण्यातून विषबाधा झाल्यास ते खाद्य अथवा पाणी जनावरास देऊ नये, ते फेकून न देता त्याच्या नमुन्याची तपासणी पशुवैद्यकाद्वारे करून घ्यावी.

सर्वसाधारण उपचार- विषबाधा झाल्यास सर्वप्रथम जनावरास रोज जे खाद्य व पाणी आपण देतो, ते सर्व बंद करून त्याऐवजी त्यास दुसरे खाद्य व पाणी द्यावे, कारण याच खाद्यातून विषबाधा झालेली असल्यास त्याची तीव्रता वाढते.- त्वरीत पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

पशुऔषध व विषशास्त्र विभागक्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ

अधिक वाचा: Animal Ear Tagging राज्यात २ कोटी ४४ लाख जनावरांचे टॅगिंग पूर्ण

टॅग्स :दुग्धव्यवसायपीकगायअन्नशेतकरीऔषधं