Join us

Dairy Farming: दुग्ध व्यवसायातून योगेशने शोधला प्रगतीचा यशस्वी मार्ग वाचा त्यांची यशकथा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:42 IST

Dairy Farming: पदवीनंतर अहिल्यानगर येथील कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून दोन गायी घेऊन सुरू केलेल्या व्यवसायात तीन वर्षात ३० गायी घेऊन दररोज ४०० लिटर दूध उत्पादन करीत खर्च वजा जाता दोन लाख रुपये महिन्याला उत्पन्न घेणाऱ्या येथील योगेश मोहन कर्डिले यांचा दुग्ध व्यवसाय आज अनेकांना स्वयंरोजगाराची प्रेरणा देत आहे. (Dairy Farming)

नितीन कांबळे

पदवीनंतर अहिल्यानगर येथील कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून दोन गायी घेऊन सुरू केलेल्या व्यवसायात तीन वर्षात ३० गायी घेऊन दररोज ४०० लिटर दूध उत्पादन करीत खर्च वजा जाता दोन लाख रुपये महिन्याला उत्पन्न घेणाऱ्या येथील योगेश मोहन कर्डिले यांचा दुग्ध व्यवसाय आज अनेकांना स्वयंरोजगाराची प्रेरणा देत आहे. (Dairy Farming)

आष्टी तालुक्यातील कडा येथील योगेश कर्डिले याने विज्ञानात पदवी मिळवली. त्यानंतर अहिल्यानगरला कंपनीत सतरा हजार रुपये महिन्याची नोकरीही केली. काही दिवस नोकरी केल्यावर कडा येथे स्वतः ची बागायती शेती असल्याने तिथेच दुग्ध व्यवसाय उभारण्याचा निश्चय केला. (Dairy Farming)

चांगली नोकरी सोडून गावाकडे परतला. सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला. मात्र, योगेशचा निश्चय पाहून त्यांनीही प्रोत्साहन दिले. घरी वडिलांचा परंपरागत दुग्ध व्यवसाय होताच. दोन गायींचे दूध डेअरीवर घालायचे व शेतीमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, बाजरी असे पीक घेत होते.

हीच पद्धत बदलून योगेशने २०२२ पासून टप्प्याटप्प्याने गायी घेऊन दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. कडा येथील दुग्ध व्यावसायिक योगेश कर्डिले यांच्या गोठ्यात अशा पद्धतीने व्यवस्थापन आणि संगोपन केले जाते. (Dairy Farming)

आई, वडील, पत्नीकडून गायींचे संगोपन

आज योगेशकडे तीस जर्सी गाई असून, दररोज चारशे लीटर दूध डेअरीला जात आहे. घरी १०० बाय १०० ची संरक्षण भिंत बांधून ८० बाय ३० चे शेड उभारत उर्वरित जागेत मुक्त गोठा केला. गायींचे संगोपन आई नंदाबाई, वडील मोहन व पत्नी कोमल हे सर्व गोठा व्यवस्थापन सांभाळत आहेत.

५ एकर शेतातच केली चाऱ्याची सोय

* शेतीमध्ये गायींना चाऱ्याची सोय केली असून मका, ऊस, गवत, वैरण आदी चारा घेतला जातो.

* विहिरीतील पाण्याची सोय केली. गायींना गोळी पेंड, भुसा यासारखे खाद्य देऊन त्यांची तब्येत सुदृढ ठेवण्यात योगेशला यश आले.

* दररोज मिळणाऱ्या चारशे लीटर दुधापासून योगेशला दोन लाख रुपये महिना निव्वळ शिल्लक राहत आहे.

स्वतः ला सिद्ध करा

* कंपनीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली राहून वीस हजार रुपये महिन्याला घेण्यापेक्षा आज योगेश स्वबळावर उभा राहिला. शिवाय कुटुंबासोबत राहून मन रमत असल्याचेही त्याने सांगितले.

* तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून स्वतः ला सिद्ध करावे. जिद्द, चिकाटी, मेहनतीची तयारी ठेवल्यास नक्कीच यश मिळेल. असे योगेश कर्डिले सांगतो.

* योगेशचा दुग्ध व्यवसाय तरुणांना स्वयंरोजगाराची प्रेरणा देत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Zero Tillage Technology: शून्य मशागत तंत्र म्हणजे काय? जाणून घ्या या तंत्राविषयी सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रदुग्धव्यवसायशेतीशेतकरीबीड