Join us

सव्वापाच लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर १३२७ कोटींचे अनुदान जमा; वाचा सविस्तर वृत्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:13 IST

Dudh Anudan : राज्य सरकारने राज्यातील सव्वापाच लाख गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १३२७ कोटी २८ लाख रुपयांचे दूध अनुदान वर्ग केले आहे. उर्वरित २६१ कोटींचे अनुदान महिन्याअखेर जमा केले जाणार आहे.

राजाराम लोंढे 

राज्य सरकारने राज्यातील सव्वापाच लाख गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १३२७ कोटी २८ लाख रुपयांचे दूध अनुदान वर्ग केले आहे.

उर्वरित २६१ कोटींचे अनुदान महिन्याअखेर जमा केले जाणार आहे. राज्याच्या तुलनेत १५८८ कोटींपैकी ९६० कोटींचे अनुदान दक्षिण महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना मिळाले आहे.

गायीच्या दुधाचे उत्पादन वाढल्याने डिसेंबर २०२३ पासून राज्यातील दूध संघांनी खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. बाटलीबंद पाण्याच्या दरापेक्षाही कमी दराने दूध खरेदी केली.

यासाठी, राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० मार्च व जुलै ते सप्टेंबर या महिन्यांसाठी प्रतिलिटर पाच रुपये, तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यासाठी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

जिल्हानिहाय मिळणारे दूध अनुदान (रक्कम कोटीत)

जिल्हाअनुदान
पुणे४६०.८०
अहमदनगर४५८,७९
सोलापूर२०३.७८
कोल्हापूर१०३.९९
सातारा१००,५९
सांगली९१.०७
नाशिक५६.३९

तिन्ही टप्प्यांतील सुमारे सव्वापाच लाख दूध उत्पादक

आतापर्यंत तिन्ही टप्प्यांतील १३२७ कोटी २८ लाख रुपये सुमारे सव्वापाच लाख दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत.

किमान हमीभाव ३४ रुपये कागदावरच

राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३४ रुपये किमान भाव देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. पण, गेल्या वर्षभरात त्याचे पालन कोणत्याच दूध संघाने केले नाही.

त्रुटींची पूर्तता केलेल्यांना मिळणार अनुदान

• दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माहिती भरताना बँकेचा खाते क्रमांक किंवा 'आयएफसी' कोड चुकल्याने अनेकांचे अनुदान आलेले नाही.

• संबंधित शेतकरी पात्र आहेत; पण, त्रुटीमुळे खात्यावर पैसे वर्ग झालेले नाहीत. त्रुटींची पूर्तता केलेल्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.

शासनाने दूध अनुदान वाटपाची प्रक्रिया राबवत असताना एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली. कोल्हापूर, सांगलीतील दूध उत्पादकांचे दोन टप्प्यांतील शंभर टक्के अनुदान जमा झाले आहे. उर्वरित दोन महिन्यांचे पैसे आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत. - एन. पी. दवडते, जिल्हा दुग्धविकास अधिकारी, सांगली.

 हेही वाचा : रेबिज बाधित जनावरांचे दूध सेवन केल्यास रेबिज होतो का? वाचा काय सांगताहेत तज्ञ

टॅग्स :दूधशेती क्षेत्रशेतकरीशेतीदुग्धव्यवसायसरकार