Join us

Sugarcane : राज्यात १८ दिवसांत ९० लाख टनाचे गाळप पण साखर उतारा कमी! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 21:11 IST

अजूनही राज्यातील संपूर्ण साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले नाही. राज्यात यंदा २०० पेक्षा जास्त साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले होते.

Pune : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. अजूनही राज्यातील संपूर्ण साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले नाही. राज्यात यंदा २०० पेक्षा जास्त साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले होते. त्यातील बहुतांश साखर कारखान्यांना गाळपाचे परवाने साखर आयुक्तालयाकडून देण्यात आले असून आत्तापर्यंत एकूण १३९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. 

दरम्यान, सुरू झालेल्या साखर कारखान्यांपैकी ७० सहकारी आणि ६९ खाजगी साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांकडून १५ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत तब्बल ९० लाख ३७ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून ६८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर आत्तापर्यंतचा सरासरी साखर उतारा हा ७.५५ एवढा आहे. 

यंदा केंद्र सरकारने उसाला ३ हजार ४०० रूपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. पण हा दर १०.२५ टक्के एवढ्या साखर उताऱ्यासाठी लागू होणार आहे. पण आत्तापर्यंतचा सरासरी साखर उतारा केवळ ७.५५ इतका आहे. अनेक उसांच्या फडात ओल असल्यामुळे साखर उतारा कमी आला आहे पण त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी असणार आहे. त्याबरोबरच एफआरपीच्या रक्कमेतून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करण्यात येणार आहे. 

मागच्या वर्षीच्या म्हणजे गाळप हंगाम २०२३-२४ हंगामात १ नोव्हेंबर रोजी साखर कारखाने सुरू झाले होते. पण यंदा १५ नोव्हेंबर रोजी गाळप सुरू झाला असून अजूनही सर्व साखर कारखान्यांनी गाळपाला सुरूवात केलेली नाही. यामुळे यंदाचा गाळप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. 

यंदा उसाचे क्षेत्र हे १ लाख हेक्टरने कमी झाले आहे. परंतु, मान्सूनचा पाऊस समाधानकारक असल्यामुळे यंदा उसाचे उत्पादन चांगले राहील, परिणामी साखर कारखाने मे महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. तर मार्च महिन्यापासून दैनिक गाळपाची क्षमता कमी होत असल्यामुळे हंगाम काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेती क्षेत्र