Join us

Shevga Powder Business : शेवग्यापासून पावडर बनविणे प्रक्रिया व्यवसायात कशा आहेत संधी? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:15 IST

शेतीला पुरक व्यवसायाची जोड देऊन शेतमालाचे दर्जा वृध्दीकरण करून त्याची टिकवण क्षमता व भाव वाढविणे ही काळाची गरज बनली आहे. या लेखात आपण अशाच शेवगा पावडर प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेणार आहोत.

सततच्या हवामान बदलामुळे शेतीव्यवसाय धोक्यात येऊ लागला आहे. कधी अवेळी पाऊस तर कधी दुष्काळ यामुळे पिकांचे नुकसान वाढू लागले आहे. तसेच शेतीमालाला मिळणारा बाजारभावही कमी आहे.

अशा परिस्थितीत शेतीला पुरक व्यवसायाची जोड देऊन शेतमालाचे दर्जा वृध्दीकरण करून त्याची टिकवण क्षमता व भाव वाढविणे ही काळाची गरज बनली आहे. या लेखात आपण अशाच शेवगा पावडर प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेणार आहोत.

मोरिंगा पावडर प्रक्रिया उद्योग हा बारमाही चालणारा व कमी खर्चात अधिक नफा देणारा उद्योग आहे. शेवगा (मोरिंगा) हे एक कोरडवाहू पीक असून भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे त्याची बारमाही लागवड व उत्पादन शक्य आहे.

शेवगा, ज्याचे वैज्ञानिक नाव Moringa oleifera आहे. याला वनस्पतिशास्त्रात श्वेत गोक्षुरी, विठाई शेवरी किंवा सहजन अशी असंख्य नावे आहेत. हे झाड त्याच्या विविध आरोग्यदायी फायद्यांमुळे आणि वैद्यकीय गुणधर्मामुळे शतकानुशतके वापरले जात आहे.

शेवगा (मोरिंगा) ही एक सुपरफूड भाजी मानली जाते, जी सामान्यतः दक्षिण भारतीय जेवणांमध्ये वापरली जाते. शेवग्याची पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असून त्यापासून अनेक मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती केली जाते.

शेवगा पावडरचे आरोग्यदायक फायदे१) मोरिंगा पावडरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'ए' असून यात भरपूर प्रमाणात लोह आढळते.२) मोरिंगामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन इ, फॉलेट, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांचे समृद्ध भंडार आहे.३) यामध्ये अनेक शक्तीशाली अॅन्टी ऑक्सीडंट आहेत. जी आपल्या शरिराला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवतात.४) मोरिंगातील Quercetin हे अॅन्टी ऑक्सिडंट रक्तदाब कमी करते, क्लोरोजेनिक अॅसिड हे रक्तातील चरबी जाळण्याचे काम करते व रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते.५) यातील सी आणि बी-कॉम्प्लेक्स विटामिन्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते शेवग्याच्या पानांचा वापर ३०० पेक्षा अधिक आजारांच्या उपचारासाठी केला जातो.

शेवगा लागवड व काढणी- मोरिंगा पावडर तयार करण्याकरिता अधिक प्रमाणात पानांची आवश्यकता असते.- याकरिता पानांचे उत्पादन घेण्यासाठी पिकाची घन लागवड केली जाते.- दोन ओळीतील अंतर साधारण २ फूट व दोन रोपांतील अंतर ९ ते १२ इंच राखले जाते.- पीक साधारण दोन ते अडीच महिन्यांचे झाल्यानंतर पाल्याची पहिली काढणी केली जाते.- त्यानंतर दर ३० ते ३५ दिवसांच्या अंतराने पाल्याची काढणी केली जाते.शेवग्यापासून पावडर कशी बनवायची आपण पुढील भागात पाहू.

श्रीमती ज्योती किसन जगतापकृषी पर्यवेक्षक, कृषी प्रक्रियाकृषी आयुक्तालय, पुणे

टॅग्स :काढणी पश्चात तंत्रज्ञानपीकशेतीशेतकरीभाज्याव्यवसाय