Kanda Prakriya Udyog : कांदा (Kanda) हा दैनंदिन लागणाऱ्या अन्नपदाथपैिकी एक असून देखील शेतकऱ्यांचे उत्पादन आणि बाजारभाव याची चांगल्या पद्धतीने सांगड घातली जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन (Onion Production) महाराष्ट्र राज्यात होत असून महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, पुणे, जळगाव, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनात अग्रणी आहेत.
तर कांदा प्रक्रिया उद्योग म्हणजे कांद्यावर प्रक्रिया (onion Processing) करून त्यापासून कांदा पावडर (Kanda Powder), कांदा फ्लेक्स, कांदा व्हिनेगर इत्यादी पदार्थ बनवता येऊ शकतात. कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करून शेतकऱ्यांना कांद्याच्या विक्रीतून योग्य भाव मिळू शकतो.
कांद्यावर प्रक्रिया करून पुढील पदार्थ करू शकतो :
कांदा पावडर :
कांदा प्रक्रिया करून त्याची पावडर बनवली जाते. कांदा पावडर बनवताना कांद्यावर पुढील क्रमाने प्रक्रिया केली जाते.
१) कांद्यापासून चकत्या बनवण्यासाठी शक्यतो पांढरा कांदा वापरतात. लहान मानेचा कांदा हा प्रक्रिया करण्यासाठी सर्वात चांगला असतो.२) कांद्याचा टोकाच्या बाजूचा भाग कापून साल काढून साधारण १० मि. मी. जाडीच्या चकत्या केल्या जातात.३) या चकत्या मिठाच्या पाण्यात भिजवल्या जातात.४) त्यानंतर अंदाजे ५५-६५ अंश सें. तापमानात ड्रायरमध्ये १२ तास ठेवतात.५) या तयार झालेल्या प्रक्रिया केलेल्या मालाला हवाबंद डब्यात पॅक करतात.६) सर्वात शेवटी वाळवलेल्या या कांद्याच्या चकत्या गिरणीच्या सहाय्याने पावडरमध्ये रूपांतरित करतात.
- कांदा पेस्ट : बदलत्या जीवनशैलीमुळे कांदा पेस्टला मागणी वाढत आहे. पेस्ट तयार करण्यासाठी कापलेले कांदे तेलामध्ये तळून घेतले जातात. नंतर मिक्सरमधून काढून त्यांची पेस्ट केली जाते. कांदा पेस्ट केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. स्वयंपाकातही वापरण्यास कांदा पेस्ट सुलभ जाते.
- लोणचे : व्हिनेगर किंवा तेलाचा वापर करून कांद्याचे लोणचे तयार करता येते. अमेरिका आणि युरोप बाजारपेठेमध्ये व्हिनेगर वापरून, तर आशिया-आफ्रिका बाजारपेठेमध्ये तेल वापरून बनवलेले कांद्याचे लोणचे लोकप्रिय आहे.
- तेल : कांद्यापासून तेलसुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये परीरक्षक म्हणूनही त्याचा वापर केला जातो.
- कांद्यावर प्रक्रिया करून वाइन / सॉस हे पदार्थ बनवणे : कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करून व्हिनेगर सॉस आणि वाइन आदींची निर्मिती करता येते.
- प्रा. राजेश्वरी कातखडे, प्रा. रोहित बनसोडे, डॉ. डी. व्ही. सुर्वे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी