Join us

Kanda Prakriya: कांदा प्रक्रिया उद्योगासाठी तुमच्याजवळ 'ही' यंत्रे असणं आवश्यक, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 20:08 IST

Onion Processing : सरळ कांदा प्रक्रिया (Kanda Prakriya) करून विविध पदार्थ करून निर्यात केल्यास शेतकऱ्यांना होणारा तोटा टाळता येऊ शकतो.

Onion Processing :  कांद्याच्या दरांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चढ उतार (Kanda Market) पाहायला मिळत असतात, त्यामुळे बाजारभावाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी कांदा चाळ (kanda Chal) करून ठेवतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात छोटे कांदा प्रक्रिया उद्योग सुरू व्हायला हवेत. ज्या वेळी कांद्याला बाजारभाव (Kanda Bajarbhav) हा २ हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी असेल अशा वेळी सरळ कांदा प्रक्रिया (Kanda Prakriya) करून विविध पदार्थ करून निर्यात केल्यास शेतकऱ्यांना होणारा तोटा टाळता येऊ शकतो.

कांदा प्रक्रिया उद्योग करण्यासाठी आवश्यक यंत्र सामग्री

१) कांद्याचे बाहेरील आवरण काढण्याचे यंत्र :

  • अशा प्रकारच्या यंत्राचा वापर करून आपण कांद्याच्या बाहेरील आवरण काढण्यास उपयोग करू शकतो. 
  • या यंत्राचा वापर करून आपण साधारण ४०-५० किलो कांद्यावरील आवरण प्रति तासाला काढू शकतो. 
  • एवढी क्षमता असलेली मशीन अंदाजे १५००० रुपयांना मिळू शकते. 
  • यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या मशीन देखील बाजारात उपलब्ध आहेत.

 

२) कांद्याच्या मुळ्या कापण्याचे यंत्र :

  • कांद्याचे शेंडे तसेच मुळ्या कापण्यासाठी यंत्र बाजारात उपलब्ध आहे. याची किंमतसुद्धा क्षमतेनुसार रु. १२००० पासून पुढे आहे.
  • काही मशीन ज्या बाजारात आहेत, त्यांची क्षमता १०० किलो ताशी आहे.

 

३) मुळ्या कापलेला व बाहेरील आवरण काढलेला कांदा धुण्यासाठी यंत्र :

  • या यंत्राचा वापर हा मुळ्या, शेंडे व बाहेरील आवरण काढलेला कांदा धुण्यासाठी केला जातो. 
  • या प्रक्रियेमुळे धूळ व अन्य खराब घटक कांद्यापासून वेगळे करता येतात व कांदा स्वच्छ होतो. 
  • अशा प्रकारचे यंत्र बाजारात १० हजार रुपयांपासून पुढे क्षमतेनुसार आहेत.

 

४) धुतलेला कांदा कापून चकत्या करण्यासाठी यंत्र :

  • या यंत्राद्वारे कांद्याच्या लहान लहान चकत्या केल्या जातात. 
  • अशा प्रकारच्या यंत्रामध्ये ०.४ मि. मी. पासून ०.८ मि. मी. पर्यंत चकत्या करता येतात. 
  • हे यंत्र स्वयंचलित असून किंमत क्षमते नुसार कमी अधिक असेल.

 

५) कांदा वाळवणी यंत्र :

  • या उपकरणामध्ये चकत्या केलेला कांदा वाळवला जातो, तसेच याला डिहायड्रेटर किंवा ड्रायर देखील म्हणतात. 
  • या मशीनमध्ये कांद्यातील पाणी काढून टाकले जाते व कांदा पूर्णपणे वाळवला जातो. 
  • या प्रक्रियेसाठी तुम्ही सोलर ड्रायरदेखील वापरू शकता. 
  • परंतु, असा चकत्या केलेला कांदा हा १० ते १२ तास ५५-६० अंश से. एवढ्या तापमानाला ठेवायचा आहे. 
  • त्यामुळे नुसत्या उन्हातया चकत्या वळवल्या तर चालेल असे नाही. 
  • बाजारात सध्या १२ पासून १९० पर्यंत ट्रे असणारे ड्रायर उपलब्ध आहेत.

 

६) गिरणी :

  • ड्रायरमध्ये वाळवलेल्या या कांद्याच्या चकत्या गिरणीच्या सहाय्याने पावडरमध्ये रूपांतरित करतात. 
  • अशा प्रकारच्या कांद्याची भुकटी करणाऱ्या गिरण्या बाजारात क्षमतेनुसार उपलब्ध आहेत. 
  • प्रति तासाला ५० किलो क्षमता असलेली मशीन सुरवातीच्या काळात पुरेशी ठरू शकते, ज्याची किंमत बाजारात १५ हजारच्या जवळपास आहे. 
  • त्यापेक्षा अधिक क्षमता असलेले ग्राइंडरदेखील बाजारात उपलब्ध आहेत. 
  • ही सर्व यंत्रे एखादी कंपनी एकत्रितरीत्या देखील उपलब्ध करून देऊ शकते किंवा वेगवेगळी देखील घेऊ शकता. 
  • ही बनवलेली कांदा पावडर हवाबंद बाटलीमध्ये किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये भरून निर्यात करू शकता.

 

प्रा. राजेश्वरी कातखडे, प्रा. प्रा. रोहित बनसोडे, प्रा. डॉ. व्ही. डी. सुर्वे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रकृषी योजनाशेती