Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli Halad Project : हिंगोलीची हळद ठरतेय 'सोनं'; महिलांच्या हातून उभा राहतोय कोटींचा ब्रँड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 10:33 IST

Hingoli Halad Project : हिंगोली जिल्ह्यात हळदीने आता 'गोल्डन' वळण घेतले आहे. महिला बचत गटांच्या पुढाकारातून हळदीपासून विविध ब्रँडेड उत्पादने तयार केली जात असून, 'हिंगोली यलो गोल्ड' या नावाने हा उपक्रम बाजारात झेप घेत आहे. (Hingoli Halad Project)

प्रसाद आर्वीकर

पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन उत्पादनाला मूल्यवर्धन देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा अभिनव प्रयोग हिंगोली जिल्ह्यात आकार घेत आहे.(Hingoli Halad Project)

हळदीच्या उत्पादनासाठी ओळख असलेल्या जिल्ह्यात आता 'हिंगोली यलो गोल्ड' या ब्रँडअंतर्गत आरोग्यवर्धक व सौंदर्यवर्धक उत्पादने तयार केली जात असून, या उपक्रमामुळे स्थानिक हळदीला खऱ्या अर्थाने 'सुवर्ण' झळाळी मिळत आहे.(Hingoli Halad Project)

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.(Hingoli Halad Project)

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला स्वयंसाहाय्यता बचत गटांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे.(Hingoli Halad Project)

उत्पादनात हिंगोलीचा मोठा वाटा

देशातील एकूण हळद लागवडीपैकी सुमारे १५ टक्के लागवड हिंगोली जिल्ह्यात होते. देशभरात अंदाजे ३.२० लाख हेक्टर क्षेत्रावर हळद घेतली जाते, त्यापैकी तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्र हिंगोलीत आहे.

इतक्या मोठ्या उत्पादनानंतरही हळदीला अपेक्षित राष्ट्रीय ओळख मिळाली नव्हती. ही उणीव भरून काढण्यासाठी मूल्यवर्धनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.

उत्पादनांची विविधता हीच ताकद

या उपक्रमांतर्गत हळदीपासून विविध उत्पादने तयार करण्यात आली आहेत. यामध्ये हळद पावडर, हळदीचे लोणचे, टर्मरिक क्रीम, हळद साबण, रोगप्रतिकारक शॉट्स, हळद तेल, नैसर्गिक कुंकू आणि हळदीचे बेणे (फिंगर्स) यांचा समावेश आहे.

आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या उत्पादनांमुळे ग्राहकांना नैसर्गिक पर्याय उपलब्ध होत आहेत.

महिला बचत गटांची उद्योजकतेकडे वाटचाल

नरसतपूर (वसमत) येथील पूजा महिला समूह, मालसेलू येथील शिवशक्ती समूह, गोरेगाव (सेनगाव) येथील राजलक्ष्मी समूह आणि उमरा येथील दुर्गामाता समूह यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून ग्रामीण महिलांना रोजगारासोबतच उद्योजकतेची नवी संधी मिळत आहे.

'लोकमत'ला सादरीकरण, संकल्पनेचे कौतुक

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लोकमत भवन येथे भेट देऊन या उपक्रमाची माहिती एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांना दिली.

या संकल्पनेचे कौतुक करताना, यामुळे हळद उत्पादक शेतकरी आणि महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

१ कोटी उलाढालीचे लक्ष्य

या प्रकल्पासाठी प्रारंभी सुमारे १५ लाख रुपयांची गुंतवणूक करून प्रायोगिक स्तरावर उत्पादन सुरू करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या उत्पादनांचे लाँचिंग करण्यात आले असून, येत्या दिवाळीपर्यंत सुमारे १ कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे.

बाजारपेठेच्या दिशेने वाटचाल

'हिंगोली यलो गोल्ड' या नावाने आकर्षक पॅकेजिंग आणि गिफ्ट बॉक्सच्या माध्यमातून उत्पादने बाजारपेठेत सादर केली जात आहेत.

सध्या हा उपक्रम प्रायोगिक टप्प्यात असला, तरी प्रशासनाची साथ, दर्जेदार उत्पादन आणि प्रभावी मार्केटिंग यामुळे या ब्रँडला मोठी बाजारपेठ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हिंगोलीची हळद आता केवळ शेती उत्पादन न राहता मूल्यवर्धनातून 'यलो गोल्ड' बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला नवे बळ मिळत आहे.

कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य

या उपक्रमासाठी प्रारंभी सुमारे १५ लाख रुपयांची गुंतवणूक करून प्रायोगिक स्वरूपात उत्पादन सुरू करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या उत्पादनांचे लाँचिंग करण्यात आले असून, येत्या दिवाळीपर्यंत सुमारे १ कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे.- राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी, हिंगोली

हे ही वाचा सविस्तर : Women Farmer Success Story : हातात रिमोट, आकाशात ड्रोन! लातूरच्या रोहीणीताईंची शेतीत 'हायटेक' भरारी

अधिक वाचा : Umed Scheme : माऊलीच्या कष्टाला लेकरांची स्मार्ट साथ; 'उमेद'ने घडवली बिझनेस क्रांती!

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli Turmeric Project: Women's brand turns turmeric into 'gold'.

Web Summary : Hingoli's turmeric gets a golden touch. Women's self-help groups create health and beauty products under 'Hingoli Yellow Gold,' aiming for a crore turnover. This empowers farmers and rural women.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेतीमहिला