Join us

Chopda Sugar Factory : आतापर्यंत 'चोसाका'चे 36 हजार मेट्रिक टन गाळप, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 19:59 IST

Chopda Sugar Factory : आगामी दोन ते तीन दिवसांत उसाचा भाव जाहीर (Sugarcane FRP) करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

जळगाव : चोपडा सहकारी साखर (Chopda Sugar Factory) कारखान्याने १७ डिसेंबरपर्यंत ३६ हजार ५३३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यावर्षी दीड लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे कारखान्याने उसाला भाव जाहीर केलेला नाही. आगामी दोन ते तीन दिवसांत उसाचा भाव जाहीर (Sugarcane FRP) करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

कारखान्याच्या गाळपासाठी कार्यक्षेत्राबाहेरून ऊस येत आहे. गेल्या वर्षी चोसाकाने २ हजार ६०० रुपये प्रति टन भाव जाहीर केला होता. पहिली उचल २ हजार २०० रुपये प्रतिटन प्रमाणे देण्यात आली होती. त्यानंतर प्रति टन १५० रुपये दोन वेगवेगळ्या टप्प्यात ऊस उत्पादक (sugarcane Farmer)  शेतकऱ्यांच्या खाती टाकण्यात आले होते यावर्षी मात्र भाव जाहीर केलेला नाही. 

साखर कारखाना चोपडा तालुक्यात असला तरी ऊस तोडणीवेळी शेतकऱ्यांना मोठी कसरत करून, आर्थिक भार सहन करून ऊसतोड करावी लागते. त्यातून खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात फारशी रक्कम येत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी उसाकडे पाठ फिरवली आहे. तसेच चोपडा तालुका कार्यक्षेत्रात भरघोस उत्पन्न देणाऱ्या उसाचे बियाणे पुरविले नसल्याने शेतकरी उसापासून दूर गेले. परिणामी चोपडा तालुका कार्यक्षेत्रात केवळ १६०० एकर क्षेत्रावर ऊस उभा आहे.

कार्यक्षेत्राबाहेरून येतोय ऊस चोसाका कार्यक्षेत्र असलेल्या चोपडा तालुक्यात उसाची लागवड अत्यल्प झाली आहे. यावर्षी चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, अमळनेर, यावल, एरंडोल, पाचोरा, जळगाव, नशिराबाद, मक्ताईनगर, शहादा, शिरपूर या तालुक्यांमधून गाळपासाठी ऊस आणला जात आहे. 

चोसाकाची आठ-आठ तासांच्या तीन शिफ्ट (पाळ्यांमध्ये) मध्ये सुरु असण्याची क्षमता आहे. मात्र एका शिफ्ट मध्ये जवळपास ८०० मेट्रिक टन ऊस गाळपासाठी लागत असतो. तेवढा ऊस उपलब्ध होत नसल्याने सध्या कारखाना दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. तीन शिफ्टमध्ये कारखाना सुरू राहिला तर साडेपाच ते सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याची क्षमता या कारखान्याची आहे. - मिलिंद देशमुख, जनरल मॅनेजर, बारामती अॅग्रो कंपनी, चोपडा. 

टॅग्स :साखर कारखानेऊसजळगावशेती